‘भाजपचे नगरसेवक विरोधी आणि महिला विरोधी धोरण उघड’
मडगाव :
रावणफोंड येथील रोड ओव्हर ब्रिजच्या आणि खारेबंद ते व्हिक्टर हॉस्पिटल रस्त्याचे सुधारणा व रुंदीकरण पायाभरणी समारंभाच्या निमंत्रण पत्रिकेतून भाजपचे नगरसेवक विरोधी आणि महिला विरोधी धोरण उघड झाले आहे. मडगावचे आमदार दिगंबर कामत यांनी निमंत्रण पत्रिकेवर मडगाव नगरपालीकेच्या उपाध्यक्षा दीपाली सावळ यांच्या नावाचा उल्लेख न केल्याच्या कृत्याचा आम्ही तीव्र निषेध करतो. निमंत्रण पत्रिकेवर इतर नगरसेवकांच्या नावाचा उल्लेख न केल्याचाही आम्ही निषेध करतो, असे दक्षिण गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांनी म्हटले आहे.
मडगावचे आमदार दिगंबर कामत यांना फक्त स्वतःची आणि कुटुंबाची काळजी आहे हे मडगावच्या जनतेने लक्षात घेतले पाहिजे. ते केवळ आपल्या मुलाला आपला राजकीय वारस म्हणून पूढे आणण्यासाठी उत्सुक आहेत. काँग्रेस समर्थित “मॉडेल मडगाव” पॅनेलवर निवडून आलेल्या नगरसेवकांबद्दल त्यांना अजीबात आदर नाही.
मडगावचे आमदार दिगंबर कामत आपण लवकरच गोव्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचा दावा करून मडगावच्या जनतेला मूर्ख बनवत आहेत. त्यांच्याबरोबर पक्षांतरात सामील झालेल्या सात आमदारांना मंत्री करण्याचे आश्वासन देऊन त्यांनी मूर्ख बनवले.
मडगावचे अनेक स्थानिक नगरसेवक काँग्रेस पक्षाच्या संपर्कात आहेत. आम्ही योग्य रणनितीने आमच्या राजकीय हालचाली करत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की दक्षिण गोव्यासाठी काँग्रेसचे उमेदवार 2024 च्या लोकसभा निवडणुकीत मडगाव मतदारसंघात आघाडीवर असतील.
मडगावचे आमदार दिगंबर कामत हे स्थानिक नगरसेवकांवर दबावाचे डावपेच वापरत आहेत. आपल्या मुलाला मडगावचा पुढच्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवार म्हणून विरोध करणाऱ्यांचा आवाज दाबण्यासाठी ते सरकारी यंत्रणा वापरत आहेत. कोंब, मालभाट आणि आकें येथील नगरसेवकांचा दिगंबर कामतांच्या मुलाला आपला नेता मानण्यास तीव्र आक्षेप आहे आणि लवकरच त्यांचे उघड बंड होईल, असे सावियो डिसिल्वा म्हणाले.