उद्योगपती सासऱ्याला जावयाने घातला 107 कोटींचा गंडा
पणजी:
गोव्यातील जावयाने दुबईस्थित अनिवासी भारतीय उद्योगपती सासऱ्याची तब्बल 107 कोटींची फसवणूक केल्याचे प्रकरण समोर आले आहे. याप्रकरणी सासरे अब्दुल लाहीर हसन यांनी जावयाविरोधात केरळ, बंगळुरू येथे हुंडा आणि आर्थिक फसवणूक तसेच गोव्यात आर्थिक फसवणुकीबाबत तक्रार दाखल केली.
संशयित मोहम्मद हाफीज शाफी (28) याला क्राइम ब्रांचने अटक केली. त्यानंतर त्याची सशर्त जामिनावर सुटकाही करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहम्मद हाफीज शाफी याने उद्योगपती अब्दुल लाहीर हसन यांच्या मुलीशी जानेवारी 2017 मध्ये विवाह केला. त्यानंतर मोहम्मद पत्नीसोबत गोव्यात राहत होता. मोहम्मद याने पत्नीच्या नावे ‘कुद्रोळी वर्ल्ड’ नावाने कंपनी सुरू केली. मोहम्मदचे सासरे अब्दुल लाहीर हसन यांनी सुरुवातीला या कंपनीत 98 कोटींची गुंतवणूक केलेली होती.
त्यानंतर मोहम्मद याने आयकर विभागाची नोटीस आल्याचे भासवून दंड भरण्यासाठी सासरे अब्दुल हसन यांच्याकडून पैसे मागण्यास सुरुवात केली. मोहम्मद पाठवत असलेल्या आयकर विभागाच्या नोटिसा बनावट असल्याचे मोहम्मद याचा मित्र अक्षय थॉमस वैद्यायन याने सांगितले.
त्यानंतर अब्दुल यांनी जावयाविरोधात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे बंगळुरू पोलिसांनीही मोहम्मद याला अटक केली होती. त्यानंतर त्याची जामिनावर सुटका झाली होती. यानंतर मोहम्मद याला गुन्हा शाखेने गुरुवारी फोंडा येथून अटक केली. अटकेनंतर फोंडा येथील प्रथमवर्ग न्यायालयाने 30 हजार रुपये दंड आणि पाच दिवस गुन्हे शाखेत हजेरी लावण्याच्या अटीवर त्याला जामीन मंजूर केला.