टीम इंडियासमोर पाकिस्तान निष्प्रभ
एकदिवसीय विश्वचषक २०२३ मध्ये शनिवारी (१४ ऑक्टोबर) पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान सामना खेळला गेला. रोमहर्षक सामन्याची अपेक्षा असताना यजमान भारतीय संघाने पाकिस्तानला या सामन्यात डोके वर काढू दिले नाही. कामगिरी केल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा व श्रेयस अय्यर यांनी तुफानी फटकेबाजी करत भारतीय संघाला विजय मिळवून दिला.
या विजयासह भारतीय संघाने सलग तीन विजय पूर्ण केले. तसेच पाकिस्तानविरुद्ध विश्वचषकातील आपली विजयाची परंपरा कायम राखली. हिटमॅनचे शतक थोडक्यात हुकले, ते जर पूर्ण झाले असते तर हा विजय आणखी परिपूर्ण झाला असता. मात्र, वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत भारताने पाकिस्तानविरुद्धची अपराजित मालिका ८-० अशी कायम राखली. या विजयासोबत भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला.
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारताचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा संघ ४२.५ षटकांत १९१ धावांवर गारद झाला. प्रत्युत्तरात भारताने ३०.३ षटकांत ३ गडी गमावत १९२ धावा करून सामना जिंकला. टीम इंडियाने विश्वचषकाच्या इतिहासात पाकिस्तानविरुद्धची विजयी मालिका सुरू ठेवली आहे. त्याचा हा आठवा विजय आहे. आता या स्पर्धेत भारताचा त्याच्याविरुद्ध पराभव झालेला नाही.
पाकिस्तानकडून मिळालेल्या १९२ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाची सुरुवात चांगली झाली नाही. डेंग्यूमधून बरा झालेला शुबमन गिल ११ चेंडूत १६ धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत चार चौकार मारले. शाहीन आफ्रिदीने त्याला शादाब खानकरवी झेलबाद केले. शुभमन फॉर्ममध्ये दिसत आहे आणि आगामी सामन्यांसाठी टीम इंडियाच्या दृष्टिकोनातून ही चांगली बातमी आहे. तो बाद झाल्यानंतर विराट कोहली क्रीजवर आला. कोहलीने रोहितसोबत दुसऱ्या विकेटसाठी ५६ धावांची भागीदारी केली.
रोहित शर्माला सलग दुसऱ्या सामन्यात शतक झळकावता आले नाही. अफगाणिस्तानविरुद्ध त्याने १३१ धावांची खेळी केली होती. या सामन्यातही त्याला शतक झळकावण्याची संधी होती, मात्र त्याला तसे करता आले नाही. रोहित ६३ चेंडूत ८६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. त्याने आपल्या खेळीत सहा चौकार आणि सहा षटकार मारले. या काळात त्याचा स्ट्राइक रेट १३६.५१ होता. रोहितने एकदिवसीय क्रिकेटमध्ये ३०० षटकारही पूर्ण केले. पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदी आणि वेस्ट इंडिजचा माजी सलामीवीर ख्रिस गेल यांच्यानंतर अशी कामगिरी करणारा तो तिसरा फलंदाज ठरला.