पणजी:
राज्यातील आगामी ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या अनुषंगाने क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी शनिवारी एक महत्वपूर्ण बैठक घेतली. डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये ही बैठक पार पडली.
या बैठकीत क्रीडा सचिव स्वेतिका सच्चन, राष्ट्रिय क्रीडा स्पर्धा आयोजन कमितीचे अध्यक्ष अमिताभ शर्मा, पोलिस महानिरीक्षक, ओमवीर सिंग बिश्नोई, पोलिस अधीक्षक अभिषेक धनिया, शोभित सक्सेना, निधिन वाल्सन, थॉमस कुक एजंसीचे अधिकारी व इतर महत्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीचे प्राथमिक मुद्दा सर्व खेळाडू, तांत्रिक अधिकारी आणि प्रेक्षक यांच्या सुरक्षेसाठी सर्वसमावेशक योजना विकसित करणे हा होता. संपूर्ण राष्ट्रीय क्रीडा दरम्यान एक मजबूत सुरक्षा प्रदान करणे, ट्रॅफिक टाळण्यासाठी वाहतुकीचे मार्ग स्पष्ट करणे आणि राज्यातील लोकांच्या नियमित हालचालींचा विचार करणे, याविषयावर चर्चा करण्यात आली. तसेच खेळाडूंना त्यांच्या निवास ठिकाणावरून सुरक्षित आणि वेळेत स्पर्धेठिकाणी पोहचण्यात कुठली उपाययोजना करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. यावेळी उद्घाटन प्रसंगी असलेली वाहतूक व्यवस्था याचा आढावा देखील मंत्री गावडे यांनी घेतला.
३७ वी राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यशस्वीरित्या आणि कुठल्याही अडथळ्याशिवाय संपूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. यामुळे वारंवार गोवा पोलीस आणि खेळाडूंची राहण्याची आणि त्यांचा वाहतुकीची जबाबदारी असलेले थॉमस कूक या एजन्सीकडे आढावा घेण्यात येत आहे. आतापर्यंत सर्व काही सुरळीत सुरू आहे, असे क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.