‘वाघ बकरी टी’ समूहाचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे निधन
Wagh Bakari ED Parag Desai Dies:
वाघ बकरी ग्रुपचे कार्यकारी संचालक पराग देसाई यांचे रविवारी अहमदाबाद येथील खासगी रुग्णालयात निधन झाले.देसाई हे ४९ वर्षांचे होते. प्राप्त माहितीनुसार, भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून जीव वाचवताना ते पडले व त्यांच्या डोक्याला मार लागला होता, त्यानंतर ते दवाखान्यात दाखल होते.
पराग हे देसाई कुटुंबातील चौथ्या पिढीतील सदस्य होते. नारनदास देसाई यांनी १८९२ मध्ये स्थापन केलेल्या कंपनीचा कारभार ते मागील काही वर्षांपासून पाहत होते.
अहमदाबाद मिररनं दिलेल्या वृत्तानुसार , पराग यांच्या राहत्या घरासमोर काही भटक्या कुत्र्यांनी त्यांच्यावर हल्ला केला होता. यावेळी त्यांना अहमदाबादच्या प्रल्हादनगर भागातील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले. २४ तासांनंतर त्यांची प्रकृती बिघडू लागल्याने, त्यांना हेबतपूर रोडवरील दुसऱ्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. सात दिवस व्हेंटिलेटरवर असणाऱ्या देसाई यांची प्रकृती रविवारी उशिरा फारच बिघडली व त्यानंतर त्यांचे निधन झाले.
पराग आणि त्यांचा चुलत भाऊ पारस देसाई हे १९९० च्या दशकात कौटुंबिक व्यवसायात सामील झाले. अमेरिकेतील लॉंग आयलँड विद्यापीठातून एमबीए केलेले पराग हे वाघ बकरी टी ग्रुपच्या संचालक मंडळातील दोन कार्यकारी संचालकांपैकी एक होते. ते कंपनीच्या विक्री, मार्केटिंग आणि निर्यातीचे नेतृत्व करत होते.
३० वर्षांहून अधिक अनुभव गाठीशी असणाऱ्या पराग यांच्या कार्यकाळात कंपनीची नेटवर्थ ही १५०० कोटींहून पुढे पोहोचली होती. , देसाई हे इतर संस्थांसह भारतीय उद्योग महासंघाचा (CII) भाग होते. पराग यांच्या निधनानंतर काँग्रेस खासदार, शक्तीसिंह गोहिल यांनी X वर श्रद्धांजली वाहिली आहे तर नेटकऱ्यांनी सुद्धा देसाई यांच्या कुटुंबाचे सांत्वन केले आहे.