‘सिल्वा, सार्दिन मंत्र्यावर दगडफेकीचे समर्थन करतात का?’
शिवजयंती आणि त्याच्या एक दिवस अगोदर सां जुझे द आरियाल येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरुन झालेल्या वादात समाजकल्याण आणि पुरातत्व खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांच्यावर माती आणि दगडफेक झाली. यात फळदेसाई किरकोळ जखमी झाले.
याप्रकरणी 20 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. आमदार क्रुझ सिल्वा आणि खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी दाखल गुन्हा मागे घेण्याची मागणी केली आहे. यावरुन भाजप नेते सावियो रॉड्रिग्ज यांनी दोघांच्या मागणीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
सां जुझे द आरियाल येथील प्रकरणात स्थानिकांच्या विरोधात दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्याची मागणी आमदार क्रुझ सिल्वा आणि खासदार फ्रान्सिस सार्दिन यांनी केला.
जमावात लपून बसलेल्या समाजकंटकांनी गोव्याच्या मंत्र्यावर दगडफेक करणे योग्य आहे, असे सांगण्याचा प्रयत्न दोघे करतायेत का? असा सवाल सावियो रॉड्रिग्ज यांनी उपस्थित केला. तसेच, जमावात लपून भ्याडहल्ला करणाऱ्यांना दोघे लपवण्याचा प्रयत्न करतायेत का? असेही रॉड्रिग्ज म्हणाले.
तसेच, जमावात बिगर गोमन्तकीय लोक देखील असताना, फक्त स्थानिकांविरोधातील गुन्हे का मागे घेतले जावेत? उद्या गोव्यात आणखी एखादे आंदोलन होईल, जमाव आणखी एखाद्या मंत्र्यावर दगडफेक करु शकतो, कायद्यांतर्गत हे आपण चालू देणार आहोत का? असा सवाल रॉड्रिग्ज यांनी उपस्थित केला.