‘मांद्रेवासीय मूक मतदानाने मांद्रेचो भूमिपुत्र भाईना प्रचंड मताधिक्य देतील’
पणजी :
येत्या लोकसभा निवडणुकीत मांद्रेवासीय पुन्हा एकदा मूक मतदानातून आपली ताकद दाखवणार आहे. ॲड. रमाकांत खलप यांचा विजय निश्चित करण्यासाठी मांद्रेकरांनी निर्धार केला आहे. मांद्रेवासीय काँग्रेसने नामांकीत केलेले इंडिया आधाडीचे उमेदवार “मांद्रेचो भूमिपुत्र भाई” यांना निर्णायक आघाडी देतील, असा विश्वास विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी व्यक्त केला.
मांद्रे मतदारसंघातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत ते बोलत होते. काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर, इंडिया आघाडीचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप, आमदार ॲड. कार्लोस अल्वारेस फरेरा, काँग्रेस नेते बाबी बागकर, गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकर, मांद्रे ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष नारायण रेडकर आदी या बैठकीला उपस्थित होते.
माझा जन्म मांद्रे गावात झाला आणि माझे या मतदारसंघाशी विशेष नाते आहे. मांद्रेचे लोक सर्व मतभेद बाजूला ठेवून माझा विजय निश्चित करण्यासाठी मला मोठी आघाडी देतील, असा मला पूर्ण विश्वास आहे, असे ॲड. रमाकांत खलप यांनी यावेळी बोलताना सांगितले.
आपली लोकशाही धोक्यात असून हुकूमशाही मोदी सरकारचा पराभव करण्यासाठी गोमंतकीयांची एकजूट झाली पाहिजे. इंडिया आघाडीचे उमेदवार ॲड. रमाकांत खलप तुमच्या सर्व आकांक्षा पूर्ण करतील, असे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी बैठकीत बोलताना सांगितले.
आम्ही आमची रणनीती तयार केली आहे आणि मला खात्री आहे की ॲड.रमाकांत खलपांसारख्या अभ्यासू आणि कर्तृत्ववान उमेदवाराच्या विजयासाठी सर्व कार्यकर्ते त्यांच्या अथक परिश्रमाने योगदान देतील असे हळदोणचे आमदार व उत्तर गोवा समन्वयक ॲड. कार्लोस फरैरा यांनी यावेळी बोलाताना सांगितले.
इंडिया आधाडीच्या सर्व नेत्यांनी नंतर आशीर्वाद घेण्यासाठी श्री भगवती मंदिर आणि श्री आजोबा मंदिराला भेट दिली. एका छोट्या चहाच्या स्टॉललाही भेट देवून उमेदवार व नेत्यांनी लोकांशी संवाद साधला.