काँग्रेसने ‘का’ केले मॉविन आणि सुदिन यांचे अभिनंदन?
भाजपच्या दक्षिण गोव्यातील पराभवावर आता “मोस्ट फ्रेंडली” भाजप मंत्री मॉविन गुदिन्हो आणि मंत्री सुदिन ढवळीकर यांचे बोल महत्वाचे आहेत. आता भाजपचे अध्यक्ष सदानंद तानावडे, पक्षबदलू आमदार संकल्प आमोणकर आणि भाजपचे लाऊडस्पीकर गिरीराज पै वेर्णेकर त्यांनी धार्मिक नेत्यांवर केलेल्या निराधार आरोपांबद्दल माफी मागणार का?, असा सवाल काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
दरम्यान, भाजप अध्यक्ष सदानंद तानावडे, पक्षबदलू आमदार संकल्प आमोणकर आणि लाऊडस्पीकर गिरीराज पै वेर्णेकर यांचा पर्दाफाश केल्याबद्दल मी वाहतुक मंत्री मॉविन गुदिन्हो आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांचे अभिनंदन करतो, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
ध्रुवीकरण हे भाजपच्या दक्षिण गोव्यातील उमेदवाराच्या पराभवाचे कारण नसल्याचा परिवहन मंत्री मॉविन गुदिन्हो आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना अमरनाथ पणजीकर यांनी समाजात विष पसरवणाऱ्या भाजप नेतृत्वाचा निषेध केला.
गोव्याचे भाजप सरकारातील वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांचे त्यांच्या कुटुंबियांच्या पलिकडे विस्तीर्ण मित्र परीवार आहे. वीजमंत्री सुदिन ढवळीकर नेहमीच ‘मांसाहारा’पासून दूर राहिले आहेत. या दोन व्यक्ती दोन विरोधाभासी जीवनशैलीचे प्रतिनिधित्व करतात आणि म्हणूनच त्यांच्या वक्तव्यांना महत्त्व प्राप्त होते, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
भाजपच्या अधिकृत संकेतस्थळावर पंतप्रधान नरेंन्द्र मोदी यांचे नाव “मार्गदर्शक मंडळ” खाली का नमूद केले आहे हे भाजप नेतृत्वाने जनतेला सांगणे महत्वाचे आहे. यावरून भाजपनेही मोदींना आता प्रशासन चालविणे जमणार नाही हे मान्य केल्याचे दिसून येते. भाजपला त्याची आता जाणीव झाली, लोकांना ते खूप आधी कळले होते, असा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला.