‘त्या’ कंत्राटदाराला अटक करून काळ्या यादीत टाकण्याची काँग्रेसची मागणी
पणजी :
राष्ट्रीय महामार्ग 66 च्या कंत्राटदाराचा पूर्ण निष्काळजीपणा आणि सुरक्षेच्या उपाययोजना करण्यात आलेले अपयश तसेच पत्रादेवी ते बांबोळीपर्यंतच्या महामार्ग विस्तारीकरणाचे हलक्या दर्जाचे काम केल्याबद्दल कंत्राटदाराला तात्काळ अटक करून काळ्या यादीत टाकण्याची मागणी कॉंग्रेस पक्षाने केली आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, हळदोणचे आमदार ॲड. कार्लोस फरैरा, केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता, सरचिटणीस ॲड. जितेंद्र गावकर, उत्तर गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर, पेलाजिया पिरीस यांचा समावेश असलेल्या शिष्टमंडळाने आज न्हंयबाग आणि धारगळ येथील भूस्खलनाच्या ठिकाणी भेट देवून पाहणी केली.
महामार्ग विस्तारीकरण कंत्राटदार एमव्हीआर इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेडने केलेल्या कामांच्या निकृष्ट दर्जाचा मुद्दा काँग्रेस पक्ष सातत्याने उपस्थित करत आहे. या ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अनेक निष्पाप लोकांचा मृत्यू झाला आहे. मी जुलै 2022 मध्ये अशाच एका भूस्खलन स्थळाला भेट दिली होती आणि रस्त्यालगत पुरेशी ड्रेनेज व्यवस्था नसल्याचे निदर्शनास आणून दिले होते. दुर्दैवाने सरकार त्यावर उपाय शोधण्यास अपयशी ठरले, अशी टीका काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली.
ठेकेदारावर भाजप सरकार कोणतीही कारवाई करत नाही कारण तो भाजपच्या सर्वोच्च नेत्याचा जावई आहे. सदर कंत्राटदाराने केलेले सर्व प्रकल्प निकृष्ट दर्जाचे असल्याचे निष्पन्न झाले आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी तातडीने सदर कंत्राटदारावर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली.
काही नियम आणि मार्गदर्शक तत्त्वांचे पालन कंत्राटदारांनी सरकारी कामे करताना करणे आवश्यक आहे. हा विशिष्ट कंत्राटदार असे कोणतेही नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे न पाळता काम करत आहे, असे हळदोणचे आमदार ॲड. कार्लोस फरैरा यांनी सांगितले.
या कंत्राटदाराने हाती घेतलेल्या सर्व प्रकल्पांचे लेखापरीक्षण करावे अशी माझी सरकारला विनंती आहे. शेकडो लोकांचे प्राण घेणाऱ्या कंत्राटदाराला भाजप सरकार संरक्षण देत आहे, असा आरोप केपेंचे आमदार एल्टन डिकोस्ता यांनी केला.
भूस्खलन होणार हे मी सरकारी अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले असूनही, सरकारने काहीच केले नाही. सरकारच्या निष्काळजीपणानेच भूस्खलन झाले. वाहतूक वळवील्याने लोकांची नाहक गैरसोय झाली, असे काँग्रेसचे सरचिटणीस म्हणाले. ॲड. जितेंद्र गावकर म्हणाले.
काँग्रेस पक्ष मुख्य सचिव आणि इतर सरकारी अधिकाऱ्यांची भेट घेऊन या मुद्द्यावर आवाज उठवेल आणि त्यांनतरही सरकार कारवाई करण्यात अपयशी ठरल्यास कायदेशीर पर्याय शोधेल असे कॉंग्रेल नेत्यांनी सांगितले.