अधिवेशनात पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या प्राधान्याने मांडणार : युरी
पणजी :
सरकारच्या सदोष धोरणांमुळे पर्यटन क्षेत्र गंभीर आव्हानांना तोंड देत आहे. ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवाच्या शिष्टमंडळाने आज मला भेटून त्यांच्या समस्या मांडल्या आणि प्रस्तावित पर्यटन विधेयकाबाबत चिंता व्यक्त केली. मी विधानसभेच्या अधिवेशनात पर्यटन क्षेत्रातील व्यावसायीकांचे मुद्दे प्राधान्याने मांडणार असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.
ट्रॅव्हल अँड टुरिझम असोसिएशन ऑफ गोवा (टीटीएजी) चे माजी अध्यक्ष सावियो मेसाईस, टिटो गोयस आणि आकाश मडगावकर यांनी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांची विधानसभा संकुल पर्वरी येथील त्यांच्या चेंबरमध्ये भेट घेतली आणि पर्यटन क्षेत्राला भेडसावणाऱ्या विविध समस्यांवर प्रकाश टाकणारे निवेदन सादर केले.
सदर निवेदनात, टीटीएजीने पर्यटन विभागाच्या प्रस्तावित विधेयकात अतिशय अव्यवस्थित तरतुदी असून त्या गोव्यातील पर्यटन व्यवसाय सुधारण्यासाठी मदतगार ठरणार नसून, उलट पर्यटन उद्योगाला मारून टाकेल. हे विधेयक दंडवसुली, शिक्षा व शुल्क वसुली यावरच जास्त केंद्रीत असून त्यामुळे पर्यटन क्षेत्रावरील खर्चात वाढ होईल आणि पर्यटनाच्या प्रत्येक क्षेत्रात सरकारी नियंत्रणे होतील असे आपल्या निवेदनात म्हटले आहे.
पर्यटन धोरण 2020 मधील प्रस्तावित विधेयकामध्ये स्थानिक पर्यटन भागधारकांच्या प्रतिनिधित्वाच्या संदर्भात विविध विचलन आहेत. सरकारच्या या नवीन विधेयकात काही राष्ट्रीय संस्थांसाठी प्रतिनिधीत्व आहे ज्यांची गोव्याच्या पर्यटन उद्योगात कोणतीही भूमिका नाही, असे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.
टीटीएजीने जादा कर आकारणी, विकास आणि शाश्वतता शुल्क लादणे आणि इतर विविध मुद्द्यांचा मुद्दा देखील उपस्थित केला आहे व त्यामुळे पर्यटन भागधारकांवर अधीक भार पडत असल्याचा दावा केला , असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी सांगितले.
भाजप सरकारने गोव्यातील खाण उद्योग बंद पाडला आहे. आता त्यांना पर्यटन उद्योग संपवायचा आहे. भाजपचे लक्ष फक्त गोव्याच्या प्रत्येक इंच जमिनीवर आहे जी त्यांना दिल्लीच्या क्रोनी भांडवलदारांना विकायची आहे. मी आगामी विधानसभेच्या अधिवेशनात हा मुद्दा उचलून धरणार असून सरकारकडून स्पष्टीकरण मागणार आहे, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.