ऍनिमेशन, व्हिज्युअल इफेक्टस, गेमिंग क्षेत्राला राज्यात आता हक्काचे स्थान
गोवा ए व्ही जी सी- एक्स आर संघटनेची करण्यात आली स्थापना
पणजी :
राज्यातील ॲनिमेशन, व्हिज्युअल इफेक्ट्स, गेमिंग आणि एक्स्टेंडेड रिॲलिटी (AVGC-XR) उद्योगांना चालना देण्यासाठी आणि त्यांना एका छत्राखाली एकत्र आणण्यासाठी महत्वाचे पाऊल पुढे पडले आहे. ‘गोवा ए व्ही जी सी- एक्स आर संघटनेची (Goa AVGC-XR association) अधिकृतपणे स्थापन करण्यात आली आहे. AVGC-XR क्षेत्रात नावीन्यपूर्ण प्रयोग करत, या सर्जनशील उद्योगांसाठी गोव्याला एक प्रमुख केंद्र म्हणून स्थान मिळवून देण्यासाठी संघटना कार्यरत राहाणार आहे.
‘आम्ही आता राज्याच्या AVGC-XR धोरणाच्या मसुद्यावर प्रामुख्याने काम करत असून, लवकरच सदर मसुदा सरकारला संघटनेच्यावतीने आम्ही सादर करणार आहोत. याद्वारे राज्यामध्ये AVGC-XR निर्मितीला चालना देणे आणि या उद्योगाच्या माध्यमातून राज्याच्या कला आणि मनोरंजन क्षेत्रामध्ये भरीव योगदान देण्यावर आमचा भर असणार आहे, असे प्रतिपादन यावेळी संघटनेचे अध्यक्ष तपन आचार्य यांनी माध्यमांना सांगितले.
चौकट :
– असे आहे संस्थापकीय कार्यकारी मंडळ
या संघटनेच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध अभिनेते तपन आचार्य यांची, उपाध्यक्षपदी पटकथालेखक, दिग्दर्शक आणि लघुपटनिर्माते किशोर अर्जुन, सचिवपदी अभिनेते आणि निवेदक रोहित खांडेकर, सहसचिवपदी संकलक, व्हीएफएक्स कलाकार विनय भट, तर कोषाध्यक्षपदी प्रसिद्ध दिग्दर्शक जितेंद्र शिकेरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे कार्यकारणीमध्ये परेश नाईक, युगांक नायक, प्रद्युम्न नाईक, विनीत कुंडईकर, मकरंद तिळवे, मेघराज आकेरकर यांच्यासह गोवा राज्याच्या गोवा आयटी कॉर्पोरेशनचे प्रतिनिधी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून आम्ही गोवा AVGC-XR असोसिएशनच्या स्थापनेवर काम करत आहोत. गोवा, मुंबई आणि पुण्यातही आमच्या अनेक बैठका झाल्या. नोव्हेंबर 2023 मध्ये आम्ही संयुक्तपणे गोव्याच्या आयटी विभागाला भेटलो, जिथे असोसिएशनच्या योजनेवर शिक्कामोर्तब झाले. या संघटनेच्या माध्यमातून आता आम्ही गोव्याच्या AVGC-XR धोरणाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी गोवा सरकारसोबत एकत्र काम करू.
– आशिष कुलकर्णी,
गोवा AVGC-XR संघटनेचे सल्लागार,
FICCI AVGC-XR फोरमचे अध्यक्ष.