स्वातंत्र्यसैनिक शशिकला आल्मेदा होडारकर यांचे निधन
मडगाव :
ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शशिकला होडारकर आल्मेदा यांचे सोमवार, 2 सप्टेंबर 2024 रोजी पुणे येथे निधन झाले आणि त्याच दिवशी सायंकाळी पुण्यातील वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर त्यांचे जावई विलास बाहूलीकर यांनी अंत्यसंस्कार केले.
त्या स्वातंत्र्यसैनिक आस्तांसिओ आल्मेदा यांच्या पत्नी आणि स्वातंत्र्यसैनिक रमेश होडारकर आणि कंपनी संचालक अरविंद होडारकर यांची बहिण होत्या.
23 जून 1931 रोजी फोंडा येथे जन्मलेल्या शशिकलाताईनी स्वातंत्र्यसैनिक सिंधुताई जोशी यांच्या नेतृत्वाखालील “राष्ट्रीय काँग्रेस” च्या बॅनरखाली गोवा मुक्ती चळवळीत धैर्याने भाग घेतला. 27 फेब्रुवारी 1955 रोजी त्यांनी मडगाव येथे सत्याग्रह केला होता आणि त्यासाठी त्यांना पोर्तुगीजांनी अटक करून 4 वर्षे तुरुंगवासात टाकले होते.
शशिकला होडारकर आल्मेदा यांनी भारताचे राष्ट्रपती उपस्थित असलेल्या 60 व्या गोवा मुक्ती दिनाच्या कार्यक्रमासाठी गोवा सरकारने त्यांना आमंत्रित न केल्याबद्दल उघडपणे नाराजी व्यक्त केली होती. स्वातंत्र्यसैनिकांना वेळेवर पेन्शन न मिळाल्याबद्दलही त्या बोलल्या होत्या.
गोवा मुक्ती चळवळीला 60 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल 19 डिसेंबर 2021 रोजी लोहिया मैदान, मडगाव येथे काँग्रेस पक्षाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. 2022 मध्ये कोस्ता ग्राउंड, मडगाव येथे “प्रियदर्शनी महिला परिषदेत” काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी वाड्रा यांच्या हस्ते त्यांचा खास सन्मान करण्यात आला होता.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष अमित पाटकर, ॲड. राधाराव ग्रासियस, विशाल पै काकोडे आणि इतरांनी ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक शशिकला आल्मेदा यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.