google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

गोव्यातील जीवघेण्या रस्त्यांसाठी सरकारच जबाबदार : अमित पाटकर

आरोग्य मंत्री आणि वाहतूक मंत्री यांनी राजीनामा द्यावा

मडगाव :
रविवार 15 सप्टेंबर 2024 रोजी रात्री कुडचडे येथे झालेल्या अपघातात रस्त्याच्या दुरवस्थेमुळे दोन जण गंभीर जखमी झाल्याची बातमी ऐकून मला धक्काच बसला. रविवारी सकाळी काँग्रेस पक्षाने कुडचडेमधील खड्डे माती आणि शेणाने बुजवून प्रवाशांचा धोका कमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, आमचे प्रयत्न कमी पडले. जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करत आहे, असे काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी म्हटले आहे.

रविवारी रात्री कुडचडे येथे झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीची विचारपूस करण्यासाठी मी दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालयात पोहोचलो, तेव्हा मला सांगण्यात आले की त्यांना जीएमसी मध्ये हलवण्यात आले आहे. कुडचडे ते मडगाव ते जीएमसी, असंवेदनशील भाजप सरकारचे आरोग्य मंत्री विश्वजित राणे आपली खुर्ची वाचवण्यासाठी गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीत व्यस्त आहेत परिणामी गोव्यातील आरोग्य व्यवस्था कोलमडली आहे. आरोग्यमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, अशी माझी मागणी आहे, असे अमित पाटकर म्हणाले.

भाजप सरकारने गोव्यातील सर्व रस्त्यांचे मृत्यूच्या सापळ्यात रूपांतर केले आहे. एका आठवड्यात 5 जणांना जीव गमवावा लागला. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गणेश चतुर्थी उत्सवात अनेक कुटुंबात अंधार पसरवीला आहे, असा आरोप अमित पाटकर यांनी केला.

गोव्यात दररोज सुमारे 7 अपघात होत असून दर 31 तासांत सरासरी एक व्यक्ती जखमी झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. गेल्या 8 महिन्यांत 186 अपघातांमध्ये 197 जणांचा मृत्यू झाला, असे अमित पाटकर यांनी नमूद केले.

वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो यांना मंत्रीपदावर राहण्याचा अधिकार नाही. ते त्यांच्या कर्तव्यात सपशेल अपयशी ठरले आहेत. एरव्ही मोठ मोठ्याने बोलणारे मॉविन गुदिन्हो आता मौन बाळगून गप्प आहेत ही लाजिरवाणी गोष्ट आहे, असे अमित पाटकर म्हणाले.

भाजप सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात काँग्रेस पक्ष आता आक्रमक होणार आहे. आम्ही गोव्यातील प्रत्येक गावात पोहोचून भाजप सरकारचे अपयश उघड करू, असा इशारा अमित पाटकर यांनी दिला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!