ईव्ही सबसिडी देण्यात दिरंगाईस सरकारची दिवाळखोरी कारण : अमरनाथ
पणजी :
ऑगस्ट २०२२ पासून आजपर्यंत ईव्ही सबसिडीचे किती अर्ज मंजूर झाले आणि किती रक्कम वितरित झाली, किती अर्ज प्रलंबित आहेत आणि भाजप सरकारची दिवाळखोरी सदर रक्कम वितरीत न होण्याचे कारण आहे का हे न्यू ॲंड रिन्यूएबल एनर्जी मंत्री सुदिन ढवळीकर स्पष्ट करतील का? असा सवाल व मागणी काँग्रेस मीडिया सेलचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर यांनी केली आहे.
प्रक्रियेच्या सर्व औपचारिकता पूर्ण केलेले बहुतेक महिलांचा समावेष असलेले अनेक अर्ज गेल्या अनेक महिन्यांपासून अनुदानाची रक्कम मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. आता सरकारी अधिकाऱ्यांनी निधी उपलब्ध नसल्यामुळे रक्कम वितरण प्रलंबित असल्याचे अर्जदारांना सांगितल्याचा दावा अमरनाथ पणजीकर यांनी केला आहे.
सरकारने फेब्रुवारी 2024 मध्ये दुचाकी वाहनांना जास्तीत जास्त 15000, तीन चाकी वाहनांना 60000 आणि चारचाकी वाहनांना जास्तीत जास्त 1 लाख अनुदान देण्यासाठी “ईव्ही वाहनांच्या प्रोत्साहनासाठी योजना पुन्हा सुरू करण्याची अधिसूचना जारी केली. तथापि, या योजनेमुळे सरकारला केवळ अर्जदारांकडून शुल्क वसूल करण्यात मदत झाली. आज शुल्क भरलेले अर्जदार पैशांच्या प्रतीक्षेत आहेत, असे अमरनाथ पणजीकर यांनी नमूद केले.
ऊर्जा मंत्री सुदिन ढवळीकर हे सदर खाते सांभाळण्यास लायक नाहित. गोव्यात पर्यायी वीजनिर्मिती वाढवण्यात तसेच ईव्ही वाहनांना चालना देण्यात ते सपशेल अपयशी ठरले आहेत, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
गोव्यात चार्जिंग स्टेशनची पुरेशी संख्या उपलब्ध नसल्याने ईव्ही वाहनधारकांना चार्जिंगची समस्या भेडसावत आहे. सरकार फक्त घोषणा करत आहे, परंतू प्रत्यक्षात काहीच होत नाही, असे अमरनाथ पणजीकर म्हणाले.
सर्व प्रलंबित अर्जांचे वितरण सरकारने तातडीने करावे, अशी आमची मागणी आहे, असे न झाल्यास काँग्रेस पक्षाला आंदोलन करण्यास भाग पाडेल, असा इशारा अमरनाथ पणजीकर यांनी दिला.