D. Gukesh becomes youngest-ever world champion: भारताचा बुद्धिबळपटू डी गुकेश विश्वविजेता ठरला आहे. दोम्माराजू गुकेश ने १८व्या वर्षी विश्वविजेता होण्याचा बहुमान पटकावला. १८वर्षीय गुकेशने जागतिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत जगज्जेता डिंग लिरेनचं आव्हान मोडून काढत इतिहास घडवला.
आतापर्यंतच्या १३ डावांपैकी ३२वर्षीय लिरेनने पहिला डाव जिंकला होता. त्यानंतर गुकेशने तिसरा डाव जिंकून बरोबरी साधली. त्यानंतर दोन्ही ग्रँडमास्टर्सनी सलग सात डाव बरोबरीत सोडवले होते. ११व्या डावात गुकेशने विजय मिळवून बरोबरीची कोंडी सोडवली. १२व्या डावात लिरेनने बाजी मारली. अखेरचा डाव कोण जिंकणार की हा मुकाबला टायब्रेकरमध्ये जाणार याकडे बुद्धिबळ चाहत्यांचं लक्ष होतं. गुकेशने दमदार खेळ करत विश्वविजेता होण्याचा मान पटकावला. सगळ्यात लहान वयाचा विश्वविजेता होण्याचा विक्रम आता गुकेशच्या नावावर नोंदला गेला आहे. लिरेनच्या हातून झालेल्या घोडचुकीनंतर गुकेश विश्वविजेता होणार असल्याचं स्पष्ट झालं आणि त्याच्या डोळ्यात विजयाश्रू तरळले.
गुरूवार, १२ डिसेंबर रोजी सिंगापूर येथे झालेल्या जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिप सामन्याच्या १४व्या निर्णायक सामन्यात डिंग लिरेनचा पराभव करून सर्वात गुकेश विश्वविजेता ठरला. गुकेश हा विश्वनाथन आनंदनंतर विश्वविजेता ठरणार दुसरा भारतीय ठरला.
गुकेश आणि डिंग यांनी गुरुवारी सामन्याच्या अंतिम डावात प्रत्येकी ६.५ गुणांसह बरोबरी साधली. १४व्या डावात, ज्यात डिंग पांढऱ्या सोंगट्यासह खेळत होता, तो सामन्याच्या ५३व्या चालीत डिंगने चूक होईपर्यंत अनिर्णित दिशेने वाटचाल केली होती. गुकेशने खेळत राहत डिंगवर दबाव आणणं सुरू ठेवलं आणि यात गतवर्षीचा विश्वविजेता लिरेन फसला.