कळंगुट : ‘आप’चे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी आज कळंगुट येथील सेंट अलेक्स चर्चला भेट देऊन गोव्यातील जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली. यावेळी पॅरिश प्रिस्ट फादर मारियानो सिल्वेरा यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी अरविंद केजरीवाल यांच्यासोबत दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि गोवा प्रभारी अतिशी, ‘आप’चे गोवा प्रदेशाध्यक्ष वाल्मिकी नाईक,कार्यकारी अध्यक्ष जर्सन गोम्स, वरिष्ठ उपाध्यक्ष संदेश तेलीकर-देसाई, संयुक्त सचिव मॅन्युएल कार्डोझो तसेच कॅरोल फर्नांडिस,जॉन फर्नांडिस, हर्टन फर्नांडिस, संदीप पेडणेकर या स्थानिक नेत्यांसह पक्षाचे स्वयंसेवक उपस्थित होते.
या प्रसंगी बोलताना अरविंद केजरीवाल म्हणाले,“आज आम्ही गोव्यातील जनतेसाठी आशीर्वाद घेण्यासाठी सेंट अलेक्स चर्चला भेट दिली.काल मी फोंड्यात होतो.तिथे लोक आरोग्य व्यवस्थेच्या दयनीय अवस्थेमुळे प्रचंड त्रस्त आहेत. गोव्याच्या प्रत्येक कोपऱ्यातील रुग्णांना गोवा मेडिकल कॉलेज (GMC) येथे धाव घ्यावी लागते. तिथेसुद्धा रेफरन्सशिवाय बेड मिळत नाही. भाजपच्या कारभाराची ही खरी वस्तुस्थिती आहे.” हे वास्तव सांगतानाच त्यांनी पंजाबमध्ये ‘आप’ सरकारने प्रत्येक नागरिकाला १० लाख रुपयांची आरोग्य विमा योजना दिली असल्याचे आवर्जून सांगितले. गोव्यातील जनतेलाही तीच सुविधा मिळायला हवी.मी फोंड्यातील जनतेला आवाहन करतो की, त्यांनी येणाऱ्या पोटनिवडणुकीत ‘आप’चा आमदार निवडून द्यावा,आम्ही तात्काळ त्यांच्या आयडी हॉस्पिटलचा कायापालट करुन दाखवू” असे आश्वासन दिले.
‘आप’चे गोवा प्रदेशाध्यक्ष वल्मिकी नाईक म्हणाले, “भाजपच्या दुर्लक्षामुळे गोव्याची आरोग्य व्यवस्था संकटात सापडली आहे. दिल्ली आणि पंजाबमध्ये ‘आप’ने दाखवून दिले आहे की, इच्छाशक्ती असेल तर दर्जेदार आरोग्यसेवा शक्य आहे.अरविंद केजरीवाल यांनी गोव्यासाठी जी भूमिका मांडली आहे ती म्हणजे आशा आणि स्पष्ट ध्येयाची कार्ययोजना आहे.”
कार्यकारी अध्यक्ष जर्सन गोम्स म्हणाले,“सेंट अलेक्स चर्चला दिलेली आजची भेट ही आमच्या या विश्वासाचे प्रतीक आहे. राजकारण हे श्रद्धा,सेवा आणि करुणेच्या आधारे चालले पाहिजे.निकृष्ट आरोग्य सुविधांमुळे गोव्यातील जनता त्रस्त आहे आणि प्रामाणिकपणे बोलून ठोस उपाय सुचवणारा एकमेव पक्ष ‘आप’ आहे.”
‘आप’चे संयुक्त सचिव मॅन्युएल कार्डोझो म्हणाले, “साध्या उपचारांसाठीही रेफरन्स आणि ओळखीवर अवलंबून राहावे लागत असल्याने जनता कंटाळली आहे. रुग्णालयांची व्यवस्था बदलण्याची आणि सार्वत्रिक आरोग्य विमा लागू करण्याची ‘आप’ची योजना गोवाकरांमध्ये जोरदार लोकप्रियता मिळवत आहे.”
‘आप’ने प्रत्येक गोवाकरासाठी १० लाख रुपयांच्या आरोग्य विमा योजनेची मागणी पुन्हा एकदा केली असून, गोव्यातील जनतेला सन्मान आणि आवश्यक सुविधा मिळेपर्यंत आरोग्य विषयक प्रश्न सातत्याने उपस्थित करत राहण्याचे आश्वासन दिले आहे.

