google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘…तर मग सरकारने डीजीपींची बदली आणि पोलिसांना निलंबित का केले?’

पणजी :

आसगाव हाऊस बुलडोझिंग प्रकरणात एकाही पोलिस अधिकाऱ्याचा हात नसेल तर पोलिस महासंचालकांची बदली आणि अन्य पोलिस अधिकाऱ्यांना का निलंबित करण्यात आले हे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने गोमंतकीयांनी स्पष्ट करावे, असे आव्हान काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी दिले आहे.


काँग्रेस भवनात पक्षाचे सरचिटणीस  ॲड. श्रीनिवास खलप, एव्हरसन वालीस आणि उत्तर गोवा जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष वीरेंद्र शिरोडकर यांच्या बरोबर घेतलेल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्षांनी भाजप सरकारला ‘गौड बंगाल सरकार’ असे संबोधून टीका केली.


सरकार आपल्या सर्व गैरकृत्यांवर पांघरूण घालण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहे. विधानसभेत दिलेल्या उत्तरानुसार, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आगरवाडेकरांच्या घराच्या दुरुस्तीच्या त्यांच्या स्वत:च्या घोषणेपासून आता माघार घेतली आहे. या प्रकरणात कोणताही पोलीस अधिकारी गुंतलेला नाही, असे उत्तरही त्यांनी दिले आहे, असे अमित पाटकर यांनी सांगितले.


मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी वेदांता, अदानी, जेएसडब्लू आणि इतरांकडून ग्रामीण कल्याण उपकरासाठी जवळपास 230 कोटी वसूल करण्यात त्यांच्या सरकारच्या अपयशाबद्दल स्पष्टीकरण द्यावे अशी आमची मागणी आहे. आमचा आरोप आहे की सरकार वसुलीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे कारण थकबाकीदार हे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे क्रोनी क्लब सदस्य आहेत, असे अमित पाटकर म्हणाले.


सरकारने प्रकल्प अहवाल तयार न करताच तसेच गोमंतकीयांसाठी रोजगाराच्या संधी, पर्यावरणावर प्रभाव आणि हरित जागेचा अभ्यास न करताच रिवण येथे आयआयटी प्रकल्पासाठी 60 कोटी रुपयांची 10 लाख चौरस मीटर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू केली. भाजपच्या खोट्या प्रचाराला बळी पडू नका, असे आम्ही सांगे आणि काणकोणच्या  लोकांना आवाहन करतो, असे अमित पाटकर म्हणाले.


सरकारनेच विधानसभेत दिलेल्या उत्तरानुसार, कुंकळ्ळीच्या एनआयटी प्रकल्पात फक्त 15 नियमित नोकऱ्या दिल्या आहेत तर 3 कंत्राटावर  आहेत आणि जवळजवळ 111 जणांना आऊटसोर्स केलेल्या एजन्सीमार्फत टेंपररी आधारावर काम दिले आहे. एनआयटी आणि आयआयटी सारख्या प्रकल्पांमुळे गोव्यात रोजगार तयार होतील, असे भाजपचे मोठे दावे या आकडेवारीवरून उघड होतात, असे अमित पाटकर यांनी नमूद केले.


आमच्या आमदारांनी विधानसभेच्या दुस-या आठवड्यात दाबोळी विमानतळाचे भवितव्य, बेरोजगारी, अयशस्वी आपत्ती व्यवस्थापन, दक्षिण गोवा जिल्हा रुग्णालय आणि गोवा आणि गोमंतकीयांशी संबंधित इतर मुद्दे उपस्थित केले. तिन्ही कॉंग्रेस आमदार त्यांच्या कामगिरीबद्दल कौतुकास पात्र आहेत, असे अमित पाटकर म्हणाले.

आमचे विधीमंडळ गटनेते युरी आलेमाव यांनी बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या  प्रवेशद्वारावरील वाहतूक कोंडी आणि विद्या प्रबोधिनी, पर्वरीच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. या प्रश्नांची तातडीने दखल घेणे सरकारला भाग पडले, असे ॲड. श्रीनिवास खलप म्हणाले.


विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी वेर्णा औद्योगिक वसाहतीतील प्रस्तावित कचरा प्रक्रिया प्रकल्पाचा मुद्दा उपस्थित केला व पर्यावरण आणि जलस्रोतांचा नाश होईल हे सरकारच्या लक्षात आणून दिले. आम्हाला आशा आहे की युरी आलेमाव यांच्या मागणीनुसार सरकार सदर प्रकल्पाचा पुनर्विचार करेल आणि प्रकल्प रद्द करेल, असे एव्हरसन वालीस यांनी सांगितले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!