गोवा
प्रियोळ भाजप मंडळ अध्यक्षपदी अनिशा गावडे
राज्यात भाजपाच्यावतीने नुकत्याच आयोजित झालेल्या ‘संघटन’ मोहिमेअंतर्गत पक्षाच्यावतीने राज्यभरातील मंडळ अध्यक्षपदाची नियुक्ती कारण्यात आली आहे. यानुसार प्रियोळ भाजप मंडळ अध्यक्षपदी अनिशा गावडे यांच्यारूपाने प्रथमच महिला अध्यक्ष लाभली आहे. मतदारसंघाचे आमदार आणि राज्याच्या कला-संस्कृती मंत्री गोविन्द गावडे आणि पक्षाच्या मतदारसंघ निरीक्षक सुलक्षणा सावंत यांच्या हस्ते अनिशा गावडे यांच्याकडे जाहीर कार्यक्रमात अध्यक्षपदाची सूत्रे नुकतीच सोपवण्यात आली.
महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपला अमित ठसा उमटवला आहे. राजकारणातही त्यांचे महत्व अनन्य साधारण आहे. अनिशा गावडे यांनी महिला गटाचे अध्यक्षपद गेली काही वर्षे अत्यंत जबाबदारीने आणि विशेष सक्रियरित्या सांभाळत प्रियोळ मंडळामध्ये भाजप चांगल्याप्रकारे रुजवला आहे, त्यामुळे अशा कर्तृत्ववान महिलेकडॆ संपूर्ण मतदारसंघ मंडळाची जबाबदारी देण्यात येते आहे, हे पक्षाच्या महिला सबलीकरणाच्या धोरणाला प्रोत्साहन देणारी विशेष बाब आहे, असे मंत्री गोविंद गावडे यांनी यावेळी सांगितले. तर अनिशा गावडे यांच्यारूपाने प्रियोळ भाजप मंडळाला प्रथमच महिला अध्यक्ष लाभत असून, अनिशा गावडे यांचे पक्षकार्य त्यासाठी सहाय्य्यभुत ठरल्याचे सुलक्षणा सावंत यांनी नमूद करत, राज्यात डॉ. प्रमोद सावंत आणि देशात नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या जोमाने तयारी केली पाहिजे, असेही आवाहन सावंत यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हापरिषद सदस्य श्रमेश भोसले, मंडळाचे मावळते अध्यक्ष दिलीप नाईक आणि पक्षाचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते.
भाजप पक्षाने आणि आमच्या आमदारांनी माझ्यावर प्रचंड विश्वास दाखवत माझ्यावर खूप मोठी जबाबदारी टाकली आहे. पक्षाचे सर्व आजी माजी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे सहकार्य घेत पुढील काळात पक्षकार्य अधिक जोमाने करत, तळागाळापर्यत भाजपचे विचार पोहोचवण्यासाठी मी कार्यरत राहीन.– अनिशा गावडे,अध्यक्ष, प्रियोळ मंडळ.