‘जावलीतला बोंडारवाडी धरण प्रकल्प पूर्ण करणारच’
सातारा (महेश पवार) :
जावली तालुक्यातील बोंडारवाडी धरण प्रकल्प उभारण्याच्या संदर्भाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करून धरणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा उरमोडी आणि कण्हेर धरणाचे पाणी अडवून धरू, असा गंभीर इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी जिल्हा प्रशासनाला दिला होता.
आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या इशाऱ्यांनंतर पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रकल्पासंदर्भात सकारात्मक बैठक झाली. जिल्हा प्रशासनाने पवार यांच्या सूचनेनुसार त्वरित कार्यवाही करावी, असे सूचीत करतानाच पाणीप्रश्न सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प पूर्ण करणारच, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी स्पष्ट केले आहे.
जावली तालुक्यातील केळघर व मेढा विभागातील पाणी टंचाई दूर व्हावी यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प उभारण्यात यावा, अशी येथील जनतेची अनेक वर्षापासूनची मागणी आहे. यासंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठकीचे आयोजन करून धरणाबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा उरमोडी आणि कण्हेर धरणाचे पाणी अडवून धरू, पाणी सोडू देणार नाही असा गंभीर इशारा आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हा प्रशासनाला दिला होता. यासंदर्भात आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्यासह जलसंपदा, पाटबंधारे विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांना निवेदनही दिले होते. आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या इशाऱ्यानंतर जिल्हा प्रशासनाने राज्य शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवून पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन केले. हि बैठक नुकतीच पार पडली असून बैठकीत धरणासाठी आवश्यक असणारे सर्वेक्षण करून घ्यावे. सर्व्हेक्षणासाठी लागणारा निधी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा वित्त मंत्री पवार यांनी दिल्या. निधी उपलब्ध झाल्यावर जलसंपदा विभागाने तातडीने कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत.
जावली तालुक्यातील विविध गावांमध्ये माजी आमदारांनी बोगस प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना राबविल्या होत्या. पाईपलाईन आहे तर मोटार नाही, मोटार आहे तर टाकी नाही अशा योजना ‘त्या’ माजी आमदारांनी जावलीकरांच्या माथी मारल्या होत्या. मला असल्या राजकारणात पडायचं नाही, मला जावलीकरांचा पाणीप्रश्न सोडवायचा आहे. सर्वसमावेशक तोडगा काढून आणि सर्वांना बरोबर घेऊन बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी माझा पहिल्यापासूनच प्रयत्न सुरु आहे. या प्रकल्पाला मंजुरी मिळावी म्हणून विधानभवनाच्या पायऱ्यांवर आंदोलनही केले होते. पवार यांच्या सहकार्यातून या प्रकल्पाला मंजुरीही मिळवली होती. आता या प्रकल्पासंदर्भात महत्वाची बैठक झाली आहे. पवार यांच्या सूचनेनुसार जिल्हा प्रशासन, जलसंपदा विभागाने तातडीने कार्यवाही करावी, असे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी म्हटले असून काहीही झाले तरी जनतेच्या हितासाठी हा प्रकल्प आपण मार्गी लावणारच, असा निर्धारही आ. शिवेंद्रसिंहराजेंनी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे व्यक्त केला आहे.