अखेर नागठाणेच्या घाडगे हॉस्पिटलचा डॉ. विकास घाडगे गजाआड
सातारा (महेश पवार) :
सातारा तालुक्यातील नागठाणे येथील घाडगे हॉस्पिटलचे अनेक कारनामे जिह्यात चर्चेत असायचे. मात्र, पोलीस, पत्रकार यांना मॅनेज करुन घाडगे हॉस्पिटलचे प्रशासन बरोबर त्यातून सहीसलामत सुटायचे अशी चर्चा सतत होते.
मात्र, नागठाणेच्याच महिलेची प्रसुती करताना बाळ दगावल्याचा आरोप हॉस्पिटल प्रशासनावर त्या महिलेने केला होता. सततच्या पाठपुराव्याने अखेर त्या घाडगे हॉस्पिटलचा डॉ. विकास घाडगे याच्यासह चौघांना अटक करुन न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने डॉ. विकास घाडगे व डॉ. मेघा घाडगे यांना न्यायालयीन कोठडी तर इतर दोघांना दि. 9 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
सातारा तालुक्यातील नागठाणे येथे घाडगे हॉस्पिटल आहे. ग्रामीण भागातील रुग्णांना चांगली सेवा देण्याऐवजी या रुग्णालयात फक्त लुटालुटीचे काम सुरु असते. रुग्ण आला की प्रॉपरली डॉक्टरकडून उपचार केले जात नाहीत. त्यामुळे अनेक महिलांना प्रसुतीदरम्यान इतर समस्यांना तोंड द्यावे लागते. अनेक घडलेल्या घटना या हॉस्पिटलच्या प्रशासनाने पोलीस आणि पत्रकारांना मॅनेज करुन दाबल्याच्या चर्चा घडत असायच्या.
मात्र, त्यास छेद दिला तो त्याच गावच्या नीलम बेंद्रे या महिलेने. नीलम बेंद्रे यांनी त्यांच्या प्रसुती काळात सुरुवातीपासूनचे उपचार घाडगे हॉस्पिटलमध्येच करत होत्या. दरम्यान, त्या रुटीन चेकअपला गेल्यानंतर डॉ. विकास घाडगे ऐवजी कंपाऊडर निलेश घाडगे याने नीलम बेंद्रे यांना मागच्या दाराने ऑपरेशन थिएटरमध्ये घेवून नर्स कोमल गायकवाड हिच्या मदतीने प्रसुती करताना बाळाला बाहेर काढताना बाळाचा मृत्यू झाला.
जर योग्य उपचार झाले असते तर बाळ वाचले असते. याबाबत त्यांनी तेथे डॉक्टरांना विचारणा केली होती. तेव्हा डॉक्टरांनी नीलम बेंद्रे आणि तिच्या पतीलाही दमबाजी करत तु परत प्रसुतीला ये तुझी मोफत प्रसुती करुन देतो, अशीही धमकी दिली. त्याबाबतची तक्रार देण्यास बोरगाव पोलीस ठाण्यात गेल्या. तेव्हा तेथेही आधीच खराब नाव असलेल्या बोरगाव पोलिसांकडून एकदम हिन दर्जाची वागणूक दिली. त्यानंतर नीलम बेंद्रे यांच्या अन्यायाला वाचा फोडली ती मिरा भाईंदरचे माजी नगरसेवक सोमनाथ पवार यांनी. त्यांनी पोलीस अधीक्षक समीर शेख यांना भेटून विनंती केली. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांच्या रिपोर्टबाबत ही शंका उपस्थित केली. सततच्या पाठपुराव्यामुळे मंगळवारी या प्रकरणात पोलिसांनी डॉ. विकास घाडगे, डॉ. मेघा घाडगे, कंपाऊंडर निलेश घाडगे आणि नर्स कोमल गायकवाड यांना अटक करुन सातारा न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने न्यायालयाने निलेश घाडगे व कोमल गायकवाड या दोघांना दि. 9 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली तर डॉ. विकास घाडगे, डॉ. मेघा घाडगे यांना न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.
बोरगाव पोलिसांची प्रतिमा सुधारणार केव्हा?
वास्तविक बोरगाव पोलिसांची प्रतिमा जो कोणी कारभारी येईल त्याच्या कारभारावरुन मलिन बनत असते अशी आजपर्यतच परंपरा आहे. एखादा दुसरा कारभारी पोलीस ठाण्याची प्रतिमा सुधारण्यासाठी प्रयत्न करताना दिसते. सध्याचे कारभारी ए.पी.आय. रवींद्र तेलतुंबडे यांच्याबाबत अनेक उलटसुलट चर्चा सुरु आहेत. त्यामुळे आधीच बोरगाव पोलीसांची डागाळलेली प्रतिमा सुधारण्याऐवजी ती आणखी बट्टा लागताना या प्रकरणावरुन दिसत आहे. कोणतीही अपेक्षा न करता पहिल्याच दिवशी सर्वसामान्य महिलेला सन्मानाची वागणूक दिली असती तर या परिसरातील महिला वर्गांसह सर्वसामान्यांमध्ये तेलतुंबडे यांच्याबाबत आदर निश्चित झाला असता. परंतु गर्भश्रींमत पोटाशी आणि सामान्य पायाखाली अशी भूमिका घेतल्याचीच चर्चा या प्रकरणात दिसून येत आहे.