‘स्तनाचा कर्करोग लवकर ओळखणे हे जीवनासाठी वरदान’
वास्को :
महिला काँग्रेसच्या अध्यक्षा बीना नाईक यांनी बुधवारी सांगितले की, स्तनाचा कर्करोग लवकर शोधून काढणे हे जीवनासाठी वरदान आहे. त्या म्हणाल्या की लवकर तपासणी केल्याने वेळेवर उपचार केले जातील याची खात्री होते, ज्यामुळे कर्करोगाच्या पेशींची वाढ सुरुवातीच्या अवस्थेपासूनच रोखण्यास मदत होते.
वास्को येथे ब्रेस्ट कॅन्सर तपासणी व जनजागृती कार्यक्रमात बीना नाईक बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन महिला काँग्रेस व वास्को गट समितीने संयुक्तपणे केले होते.
नाईक म्हणाल्या की, महिलांनी आत्मपरीक्षणाबरोबरच त्यांना कर्करोगाची शंका असल्यास डॉक्टरांनाही भेटावे व तपासणी करून घ्यावी.
“स्तन कर्करोगाची तपासणी करण्यासाठी महिलांनी पुढे यावे. त्याची तपासणी करून कर्करोगाचा प्रसार थांबवायला हवा. आपणही याबाबत जनजागृती केली पाहिजे,’’ असे त्या म्हणाल्या.
बहुसंख्य महिलांना मदत व्हावी यासाठी असे कार्यक्रम आयोजित करण्याचा आपला मानस असल्याचे बीना नाईक यांनी सांगितले. “आपण सर्वांनी या दिशेने काम करणे आणि महिलांना मदत करणे आवश्यक आहे,” असे ती म्हणाली.
वास्को गट अध्यक्ष अॅड. मेल्विन फर्नांडिस यांनी सांगितले की, कर्करोगाचा लवकर शोध घेणे आवश्यक आहे आणि सर्व महिलांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की सुरुवातीच्या टप्प्यातच कर्करोग आढळल्यास त्यावर उत्तमपणे उपचार करता येतात.
वास्को महिला ब्लॉक अध्यक्षा मंदा उर्फ सुचिता शिरोडकर यांनी आभार मानले. जेनिफर कार्लूस आल्मेदा आदी यावेळी उपस्थित होत्या.