‘कॅगने जीएमसीच्या अनारोग्याचाच पर्दाफाश केला’
पणजी :
गोवा वैद्यकीय महाविद्यालय आणि आरोग्य विभागात सर्व काही ठीक नाही. कॅगच्या अहवालानुसार राज्याच्या तिजोरीवर १६२ कोटींचा डल्ला घातला गेला आहे. सदर खर्च रुग्णांच्या भल्यासाठी नव्हे तर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्या फायद्यासाठीच केला गेला आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांना हटवून चौकशीचे आदेश देतील का? असा सवाल काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर यांनी केला आहे.
गोवा वैद्यकीय महाविद्यालयाने २०१८ पासून मेसर्स वेलनेस फॉरएव्हर मेडिकेअरकडून रु. २६२ कोटींची औषधांची खरेदी केली असून, आता महालेखापालानी सदर खरेदीत सरकारी मार्गदर्शक तत्त्वांचे घोर उल्लंघन झाल्याचे म्हटले आहे. हा भाजप सरकारचा उघड भ्रष्टाचार आहे असे अमित पाटकर म्हणाले.
ही खरेदी करताना वित्त विभागाचीही मंजुरी घेतली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. घोटाळेबाज मंत्री विश्वजित राणे यांची तात्काळ हकालपट्टी झाली पाहिजे आणि गोमॅको आणि आरोग्य खात्याने केलेल्या सर्व खरेदीची उच्चस्तरीय चौकशी झाली पाहिजे; विशेषत: कोविड महामारीच्या काळात केलेल्या खरेदींची चौकशी होणे गरजेचे आहे अशी अमित पाटकर यांनी मागणी केली आहे.
कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी फेब्रुवारी २०२० मध्ये निवीदा न काढताच सदर वेलनेस फोरॲवर कंपनीकडुन ४० कोटी रुपयांच्या औषध खरेदीचा घोटाळा उघड केला होता याची आठवण अमित पाटकर यांनी करुन दिली आहे.
काँग्रेस पक्षाने यापूर्वी आरोग्यमंत्र्यांच्या कोविडवर प्रतिबंधात्मक उपचार म्हणून वापरायच्या आयव्हरमेक्टिन गोळ्या खरेदी घोटाळ्याचा पर्दाफाश केला होता. काँग्रेस पक्षाने सदर गोळ्यांच्या खरेदीतील भ्रष्टाचाराचा पर्दाफाश केल्यानंतर त्यांना सदर प्रस्ताव रद्द करावा लागला. सुमारे २२ कोटींच्या खरेदी केलेल्या गोळ्या कुठे वापरल्या गेल्या याची चौकशी व्हावी, अशी आमची मागणी आहे, असे अमित पाटकर यांनी नमूद केले.
मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आव्हान देतो की, त्यांना खरोखरच प्रशासन स्वच्छ करायचे आहे आणि भ्रष्टाचार बंद करायचा असेल तर त्यानी आरोग्यमंत्र्यांवर कृती करून दाखवावी. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्यावर कारवाई करण्यात ते अपयशी ठरल्यास डॉ. प्रमोद सावंत या भ्रष्टाचाराच्या सौद्यात भागधारक असल्याचे सिद्ध होईल, असे अमित पाटकर म्हणाले.