‘रेल्वे थांबवा अन्यथा ‘काणकोण बंद”
काणकोण:
काणकोण येथे ‘थांबा’ मागण्याबाबत आज येथील जेष्ठ नागरिकांनी आंदोलन करुन, मागणी मान्य न झाल्यास काणकोण बंदचे आवाहन करणार असल्याचे म्हटले आहे.
जनार्दन एस. भंडारी, समन्वयक- काणकोण रेल्वे थांबा बचाव कृती समिती, यांनी यावेळी बोलताना रेल्वे अधिकारी ह्या मागणीवर दुर्लक्ष करुन लोकांवर अन्याय करत असल्याचे म्हणाले.
” आमची मागणी मान्य केली नाही तर आम्ही पुढचे पाऊल टाकू. १९ जानेवरी रोजी काणकोण येथे मामलेदारां बरोबर आमची बैठक होणार. तदनंतर आम्ही मागणी मान्य न झाल्यास बंदचे आवाहन करु आणि लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लढू,” असे भंडारी म्हणाले.
“आपल्या काणकोणकर बांधवांनी कोकण रेल्वेसाठी काय बलिदान दिले, कोकण रेल्वे प्रकल्पासाठी आपल्या जमिनी अत्यंत स्वस्त दरात दिल्या, काणकोणात कोकण रेल्वेच्या समर्थनार्थ आंदोलन केले, कोकण रेल्वेला पाठिंबा दिल्याबद्दल लाठीचार्ज आणि पोलीस केसेसचा सामना करावा लागला, हे निळ काणकोणकरांना माहीत आहे. कणकोण फोरमचे ज्येष्ठ नागरिक सदस्य ही त्याची अचूक उदाहरणे आहेत. पण काणकोणकरांना शेवटी काय मिळते?,” असा प्रश्न त्यांनी केला.
कोविड महामारीच्या काळात कोकण रेल्वेने मोठ्या प्रमाणात प्रसार टाळण्यासाठी रेल्वेने लांब पल्ल्याच्या रेल्वे/एक्स्प्रेस गाड्यांना येथील थांबा रद्द केला. परंतु महामारी संपल्यानंतरही या गाड्या कोविडपूर्व वेळेप्रमाणे काणकोण येथे थांबत नाहीत. काणकोण येथील ज्येष्ठ नागरिकांनी हा प्रश्न आधीच वरपासून खालपर्यंत रेल्वे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला आहे आणि केंद्रीय मंत्री/खासदार/स्थानिक आमदार यांनाही कळविले आहे, परंतु या ठिकाणी लांब पल्ल्याच्या/एक्स्प्रेस गाड्यांचे थांबे पुन्हा सुरू करून ज्येष्ठ नागरिकांच्या समस्येचे निराकरण करण्याचा कोणीही गांभीर्याने प्रयत्न केला नाही, असे ते म्हणाले.
लांब पल्ल्याच्या/एक्स्प्रेस गाड्यांना थांबा मिळणे हा आमचा हक्क आहे. त्यामुळे आपण एकत्र येऊन आपल्या न्याय्य मागण्यांसाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. निवडून आलेले लोकप्रतिनिधी आम्हाला मदत करणार नाहीत पण आम्ही आमच्या हक्कासाठी लढण्यासाठी आणि तो मिळवण्यासाठी पुरेसे सक्षम आहोत, असे ते पुढे म्हणाले.
सकाळी सुरु केलेले आंदोलन मामलेदाराच्या हस्तक्षेपा नंतर मागे घेण्यात आला. त्यांच्या बरोबर बैठक झाल्यावर काणकोण बंदचा निर्णय घेणार असल्याचे ते म्हणाले.