म्हादई : मुख्यमंत्री सावंत इतर मंत्र्यांसह अमित शाह यांना भेटणार
केंद्रीय जल आयोगाने म्हाईद नदीवरील प्रकल्पाबाबत कर्नाटकच्या नव्या डीपीआरला मंजुरी दिल्यापासून गोव्यात त्याचे तीव्र पडसाद उमटले आहेत. सर्व स्तरातून या गोष्टीचा निषेध केला जात असून आता गोव्यात म्हादईसाठी जनआंदोलनही उभारले गेले आहे. म्हादई वाचविण्याच्या याच प्रयत्नांचा भाग म्हणून आता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे त्यांच्या मंत्रीमंडळातील सहकाऱ्यांसमवेत केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांची भेट घेणार आहेत.
अमित शाह यांना भेटणार असल्याचे सत्ताधारी गटाकडून आधीपासूनच सांगितले जात होते. उद्या, बुधवारी सायंकाळी सात वाजता ही बैठक होणार असल्याचे समजते. अमित शाह यांनी या भेटीसाठी वेळ दिली आहे. शाह यांना जे शिष्टमंडळ भेटणार आहे त्यामध्ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह विधानसभेचे सभापती रमेश तवडकर, जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर, पर्यावरण मंत्री निलेश काब्राल, वनमंत्री विश्वजीत राणे, वीजमंत्री सुदीन ढवळीकर यांचा समावेश असणार आहे.
केंद्रीय गृह मंत्री अमित शाह हे केंद्रीय मंत्रीमंडळातील महत्वाचे नेते आहेत. ते जेव्हा एखाद्या विषयात हात घालतात तेव्हा त्यात मार्ग काढल्याशिवाय ते मागे हटत नाहीत. ते मंत्रीमंडळातील पंतप्रधान मोदी यांच्यानंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत. सरकारसह भाजपमध्ये त्यांच्या शब्दाला मोठा मान आहे. त्यामुळेच गोव्याची अस्मिता असलेल्या म्हादई नदीचा प्रश्न राज्यातील नेत्यांनी शाह यांच्या कानावर घातल्यावर शाह काय भूमिका घेतात, याकडे गोव्यासह कर्नाटकचे लक्ष लागले आहे.