अबकारी घोटाळ्यातील सर्व रक्कम वसुल करणार : मुख्यमंत्री
मद्यविक्री परवान्यांच्या नूतनीकरणातून परवानाधारकांची २ कोटी रूपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण सध्या गाजत आहे. अबकारी खाते खुद्द मुख्यमंत्र्यांकडे असल्याने याबाबत विचारणा केली असता, या घोटाळ्यातील सर्व रक्कम वसुल करणार, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईळ. मला शंभर टक्के खात्री आहे की अबकारी आयुक्त या घोटाळ्यातील सर्व पैशांची वसुली करतील. जी कारवाई करणे गरजेचे आहे ती केली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले.
अबकारी खात्याच्या पेडणे कार्यालयात ही 2 कोटींची फसवणूक झाली होती. यात गुंतलेल्या वरिष्ठ कारकुनासह त्या कार्यालयातील आणखी काही कर्मचारी व अधिकाऱ्यांची या प्रकरणी चौकशी करण्यात येणार आहे. फसवणूक झालेल्यांची जबानी घेतल्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
अबकारी खात्याकडे सुमारे 70 ते 80 तक्रारी आल्या आहेत. दरम्यान ज्या कारकुनावर या घोटाळ्याचा ठपका ठेवला आहे, त्याला त्वरित निलंबित न करता त्याची बदली केली गेली आहे. त्याच्यावर कारवाईची मागणी केली जात आहे.