‘सत्तेत आल्यास केंद्र सरकारच्या 30 लाख नोकऱ्या देणार’
पणजी:
आगामी लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाची सत्ता आल्यास देशभरातील तरुणांसाठी 30 लाख कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या भरण्याचे आश्वासन गोवा प्रदेश काँग्रेस समितीच्या नेत्यांनी दिले.
गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद संबोधित केली आणि आरोप केला की भाजप सरकारच्या मागील दोन कार्यकाळात ते रोजगार निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत.
दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दिन, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि केपेचे आमदार अॅल्टन डिकोस्ता उपस्थित होते.
पाटकर म्हणाले की, भारत जोडो न्याय यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आदिवासीबहुल राजस्थानमधील बांसवाडा भागात पोहोचल्यानंतर तरुणांना 30 लाख कायमस्वरूपी सरकारी नोकऱ्या देण्याचे आश्वासन दिले आहे.
“सरकारच्या विविध खात्यांमधील रिक्त पदे भरून आमच्या बेरोजगार तरुणांना मदत करण्यासाठी आमचा पक्ष कटिबद्ध आहे, ज्यात भाजप अपयशी ठरला आहे. केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये 10 लाख मंजूर पदे रिक्त आहेत,” असे पाटकर म्हणाले.
ते म्हणाले की, काँग्रेस सत्तेत आल्यावर त्यांचा पक्ष रिक्त पदे भरण्यास प्राधान्य देईल, खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीसोबत एक वर्षाची ॲप्रेन्टीशीप सुरू करेल, ’पेपर लीक’ रोखेल, स्टार्ट-अपसाठी रु 5,000 कोटी निधी आणि ’गीग’ कामगारांच्या कल्याणासाठी काम करणार.
पाटकर म्हणाले की, 25 वर्षांखालील प्रत्येक डिप्लोमाधारक किंवा महाविद्यालयीन पदवीधरांना खाजगी किंवा सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीत एक वर्षाची ॲप्रेन्टीशीप देण्यासाठी काँग्रेस नवीन ॲप्रेन्टीशीप अधिकार कायद्याची हमी देते. “आम्ही हे सुनिश्चित करू की त्यांना वर्षाला 1 लाख रुपये मिळतील. यामुळे प्रत्येक पात्र व्यक्तीला प्लेसमेंट मिळेल,” पाटकर म्हणाले.
ते म्हणाले की त्यांचा पक्ष परीक्षा आयोजित करताना प्रामाणिकपणा आणि निष्पक्षतेचे सर्वोच्च मानक सुनिश्चित करण्यासाठी नवीन कायदे आणेल ज्यामुळे पेपर फुटीला प्रतिबंध होईल व कोट्यवधी तरुणांचे भविष्य नष्ट होण्यापासून वाचेल.
“पाच वर्षांच्या कालावधीसाठी रु 5,000 कोटी कॉर्पस तयार करू, ज्याचे वाटप देशातील सर्व जिल्ह्यांमध्ये करण्यात येणार. 40 वर्षांखालील तरुण कोणत्याही क्षेत्रातील त्यांच्या व्यावसायिक उपक्रमांसाठी स्टार्ट-अप निधी मिळवू शकणार,’’ असे ते म्हणाले.
“गिग इकॉनॉमीमध्ये दरवर्षी रोजगार शोधणाऱ्या लाखो तरुणांसाठी चांगली कामाची परिस्थिती आणि सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी काँग्रेस कायदा आणण्याची हमी देतो,” असे पाटकर म्हणाले.
रोजगार निर्मितीचे आश्वासन पाळण्यात भाजप अपयशी ठरल्याचा आरोप पाटकर यांनी केला. “प्रत्येक निवडणुकीत भाजप नेते नोकऱ्या देण्याचे आश्वासन देतात. मात्र दिलेली आश्वासने पाळण्यात अपयश आले आहे. त्यांची आश्वासने आता देशातील लोक ‘जुमला’ मानत आहेत,” असे पाटकर म्हणाले.
…