”आप’च्या आमदारांनी लोकांची दिशाभूल करू नये’
पणजी :
सत्ताधारी पक्ष भाजपसोबत आपण कोणतीही ‘सेटिंग’ केली नसल्याचे स्पष्ट करून काँग्रेसचे आमदार अॅड. कार्लूस आल्वारेस फॅरेरा यांनी मंगळवारी सांगितले की, सरकारने विरोधकांनी दिलेल्या सूचना मान्य करणे म्हणजे त्याच्याकडे ‘विजय’ या दृष्टीने पाहिले पाहिजे.
आम आदमी पक्षाचे आमदार व्हेंझी व्हिएगस यांनी केलेल्या आरोपावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.
अॅड. कार्लूस फॅरेरा यांनी नुकत्याच संपलेल्या विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान विरोधकांचा आवाज कमी करून विधेयके मंजूर करण्यात सरकारला मदत केली, असा आरोप आपच्या आमदाराने केला होत.
फॅरेरा यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन आपच्या आमदाराने केलेले आरोप फेटाळून लावले. काँग्रेस मीडिया विभागाचे अध्यक्ष अमरनाथ पणजीकर हेही यावेळी उपस्थित होते.
“मुख्यमंत्र्यांनी विरोधकांकडून सूचना मागितल्या आणि सरकारने त्या मान्य केल्या तर तो विरोधकांचा विजय मानला पाहिजे. आम्ही इथे नाटक करायला किंवा लोकांशी खोटं बोलायला आलो नाही. एखाद्याने सभागृहाची दिशाभूल करू नये,” असे फॅरेरा म्हणाले.
काँग्रेस नेते फॅरेरा यांनी सांगितले की व्हिएगस यांनी प्रथम हे समजून घेतले पाहिजे की त्यांनी चर्चे दरम्यान कृषी आणि कोमुनिदाद विधेयकातील दुरुस्तीला विरोध केला होता.
“मला माहित आहे मी विधानसभेत काय बोलतो. मी कुठल्याच प्रकारची दिशाभूल करत नाही आणि करणार नाही. विधेयक मंजूर करण्यासाठी सरकारकडे पाहिजे तेव्हढे संख्याबळ आहे. त्यांचाकडे 33 आमदार आहेत, जे विधेयक मंजूर करून घेण्यासाठी खूप आहेत आणि आम्ही फक्त 7 आमदार आहोत. सत्ताधारी पक्ष त्यांना हवे ते करू शकतात. तथापि, मी कोमुनिदाद कायद्याची कित्येक कलमे स्पष्टपणे सांगितली आहे आणि दुरुस्तीला विरोध केला आहे,” असे फॅरेरा म्हणाले.
फॅरेरा यांनी व्हेन्झी व्हिएगसचा दावा खोडून काढण्यासाठी उच्च न्यायालयाचा निकालही सादर केला की कोमुनिदाद संहितेच्या कलम 652 चे पालन केल्याशिवाय कोमुनिदाद कोडमध्ये दुरुस्ती करणे शक्य नाही.
ते म्हणाले की, विधानसभेत खोटी विधाने करणे पूर्णपणे चुकीचे आहे. “मी कायद्याची योग्य स्थिती सांगितल्यामुळे तो (व्हिएगस) रागावला,” असे काँग्रेस आमदार फॅरेरा म्हणाले.
“जे लोक निवडून आले आहेत आणि पूर्णपणे खोटी विधाने करतात आणि सभागृहात खोटे बोलतात अशा लोकांवर लोक विश्वास ठेवू शकतात का? नागरिकांची दिशाभूल करू पाहणाऱ्या पक्षावर विश्वास ठेवता येईल का? ते गोवा वाचवतील असे तुम्हाला वाटते का?” असा सवाल फॅरेरा यांनी केला
ते म्हणाले की, ‘आप’च्या आमदारांनी काँग्रेसची प्रतिमा मलीन करण्याचे थांबवावे. “आम्ही या दुरुस्तीला विरोध करण्यासाठी सभापती समोर गेलो होतो आणि आम्ही आमचा विरोध दर्शविला होता,‘ असे ते म्हणाले.
“मी विधेयकाला विरोध करण्यासाठी विरोधकांसोबत उभा राहिलो. मी सरकारला मत दिले नाही किंवा मी सभागृहातून बाहेर गेलो नाही. मी मडगाव कोमुनिदादचा प्रमुख भागधारक आहे आणि अशा अनेक कम्युनिदादचा भागधारक देखील आहे. मग माझ्या मनात कोमुनिदादचे हित नसेल का?,’ असा सवाल त्यांनी केला.
फॅरेरा म्हणाले की, त्यांनी कृषी विधेयकातील दुरुस्तीला सुद्धा आक्षेप घेतला होता.