‘एलडीसी भरती घोटाळ्यातील संधीसाधूंची चौकशी करा’
मडगाव :
कोणाला किती एलडीसी पदांचे वाटप झाले? कोणाच्या विनंत्या नाकारल्या गेल्या? 7 पदांच्या मागणीचे गूढ काय आहे? मिशन टोटल कमिशनचे भागीदार कोण आहेत? या सर्व प्रश्नांची उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमूर्तींकडून चौकशी व्हावी, अशी मागणी काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी केली आहे.
डॉ.प्रमोद सावंत यांच्या भ्रष्ट भाजप सरकारला सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. संधीसाधूंना राजकीय लाभ उठवू देऊ नका आणि सुशिक्षित बेरोजगार गोव्यातील तरुणांच्या भविष्याशी खेळू नका. स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत सर्व भरती प्रक्रिया करणे हा एकच मार्ग आहे. एलडीसी पदे रद्द करा, अशी मागणी अमित पाटकर यांनी केली आहे.
विश्वसनीय सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एका राजकारण्याने सात एलडीसी पदांची मागणी केली होती परंतु महसूल मंत्री आंतानासीयो मोन्सेरात यांनी त्या राजकारण्याला उपकृत करण्यास नकार दिला. आणखी एका सुत्रानूसार, भाजपच्या एका पदाधिकाऱ्याच्या शिफारसीनुसार अनेक जणांना निवडण्यात आले आहेत. या सगळ्याची चौकशी होणे गरजेचे आहे, असे अमित पाटकर म्हणाले.
गोव्यातील सुशिक्षित तरुणांच्या भवितव्याशी काँग्रेस पक्ष कोणालाही खेळू देणार नाही. भरती प्रक्रियेमध्ये भ्रष्ट कार्यपद्धतीचा अवलंब करून भाजपने गोमंतकीयांच्या आशा-आकांक्षा उद्ध्वस्त केल्या आहेत, असा आरोप अमित पाटकर यांनी केला आहे.
महसूल मंत्री बाबुश मोन्सेरात हे नोकऱ्यांच्या विक्रीबाबत पुरावे मागत आहेत, हे धक्कादायक आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मिशन टोटल कमिशनच्या पावत्या देण्याची नवीन योजना सुरू केली आहे का, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे, असे अमित पाटकर म्हणाले.
आम्ही एकंदर घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहोत. गोव्याच्या आणि युवकांच्या भवितव्याशी आम्ही कोणत्याही राजकारण्याला खेळू देणार नाही. आम्ही वस्तुस्थिती आणि सत्याच्या बाजूने उभे राहू. लक्ष विचलित करण्यासाठी एकमेकांच्या संगनमताने स्वार्थीं राजकारण्यांनी मांडलेल्या कपटाला बळी पडणार नाही, असे अमित पाटकर म्हणाले.