चीनमधील आरोग्य प्राधिकरणाच्या आकडेवारीनुसार देशात या आठवड्यातील एका दिवसात तब्बल ३७ मिलियन म्हणजेच ३ कोटी ७० लाख लोकांना करोनाचा (coronavirus) संसर्ग झाला आहे. जगामध्ये एका दिवसात सर्वाधिक लोकांना एकाच दिवशी झालेल्या संसर्गाचा विक्रम या चीनमधील करोनाच्या (Coronavirus) लाटेने मोडीत काढला आहे. जगभरामध्ये चीनमधील करोना बाधितांची आकडेवारी लपवली जात असल्याची शंका उपस्थित केली जात असतानाच चीनमधील परिस्थितीबद्दल आणि संसर्ग झालेल्यांच्या आकडेवारीबद्दल शंका उपस्थित केली जात आहे. असं असतानाच ‘ब्लुमबर्ग’च्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार बुधवारी झालेल्या आरोग्य प्राधिकरणाच्या बैठकीमधून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. डिसेंबरच्या पहिल्या २० दिवसांमध्ये २४८ मिलियन लोकांना या विषाणूचा संसर्ग झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
ही आकडेवारी बरोबर असल्यास एकाच वेळी सर्वाधिक लोकांना करोना (coronavirus) संसर्ग होण्याचा विक्रम मोडीत निघाल्याचं सांगितलं जात आहे. बीजिंगमधून करोनासंदर्भातील शून्य कोव्हिड धोर रद्द करण्यात आल्यानंतर नव्याने करोनाची लाट आली आहे. यामध्ये सर्वाधिक करोनाबाधित हे ओमायक्रॉन व्हेरिएंटचे आहेत. वृत्तसंस्थांनी दिलेल्या बातम्यांनुसार चीनच्या नैऋत्येला असलेल्या सिचुआन प्रांतात आणि बीजिंगमध्ये करोनाचा मोठ्या प्रमाणात फैलाव झाला आहे. चीनमध्ये सध्या करोनाची बाधा झाली आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी लोक घरच्या घरी टेस्ट किटच्या माध्यमातून चाचण्या करत आहेत. तसेच रॅपिड अॅण्टीजन चाचण्याही मोठ्या प्रमाणात केल्या जात आहेत. जागोजागी चाचण्यांसाठी केंद्र उभारण्यात आली आहेत.
दुसरीकडे चीन सरकारने रोज करोनाबाधितांची (coronavirus) आकडेवारी जाहीर करणं बंद केलं आहे. डेटा कन्सल्टन्सी कंपनी असलेल्या मेट्रो डेटा टेकचे मुख्य अर्थतज्ज्ञ चेक किन यांनी ऑनलाइन कीवर्ड सर्चच्या विश्लेषणाच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, चीनमधील बहुतांश शहरांमध्ये डिसेंबरच्या मध्यापासून ते जानेवारीच्या शेवटापर्यंत करोनाचा संसर्ग पीकवर म्हणजेच सर्वोच्च स्थानी असेल. किन यांच्या दाव्यानुसार शेन्जेन, शांघाय, चोंगकिंगसारख्या शहरांमध्ये आताच लाखोंच्या संख्येने करोना रुग्ण आहेत.
राष्ट्राध्यक्ष जिनपिंग या बैठकीनंतर चीनमध्ये संपूर्ण लॉकडाउनची घोषणा करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार बीजिंगमध्ये करोना संसर्गाचा दर हा ५० ते ७० टक्क्यांच्या आसपास असण्याची शक्यता आहे. आर्थिक राजधानी असलेल्या शांघायमध्ये पुढल्या आठवड्यामध्ये जवळजवळ अडीच कोटी लोकांना करोनाचा संसर्ग झालेला असेल असा एक अंदाज व्यक्त केला जात आहे.
जिनपिंग सरकारने करोनाबाधितांची आकडेवारी लपवल्याचे आरोपही केले जात आहेत. सरकारी आकडेवारीनुसार मागील आठवड्यामध्ये करोना संसर्गामुळे (coronavirus) केवळ आठ जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र प्रसारमाध्मयांनी दिलेल्या आकडेवारीनुसार केवळ २० डिसेंबर रोजी ३ कोटी ७० लाख लोकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. १९ आणि १८ डिसेंबर रोजी ११ लाख लोकांच्या मृत्यूपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्यात आले आहेत. बीजिंगमध्ये आणि शांघायमध्ये प्रत्येक ६० तर चेंगदुमध्ये ४० नव्या दफनभूमी तयार करण्यात आल्याच्या बातम्या चिनी प्रसारमाध्यमांनी दिल्या आहेत.