‘सरकारच्या असंवेदनशीलतेवर दाजींनी मुख्यमंत्री सावंतांना दाखवला आरसा’
मडगाव :
वास्कोचे भाजप आमदार दाजी साळकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना भाजप सरकारच्या असंवेदनशील कार्यपद्धतीमुळे वास्कोतील रहिवाशांना होणाऱ्या त्रासाबाबत आरसा दाखवला. त्यांनी सलग पाठपुरावा करूनही मुख्यमंत्र्यांनी बेरोजगारी आणि घरांना तडे जाण्याच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्याचे स्थानिक आमदारांच्या भाषणावरून स्पष्ट होते, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
वास्को येथील निवडणूक सभेत वास्कोचे आमदार कृष्णा उर्फ दाजी साळकर आणि मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या भाषणावर प्रतिक्रिया देताना विरोधी पक्षनेत्यांनी बेरोजगारी आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल भाजपवर टीका केली. युरी आलेमाव यांनी वास्कोचे आमदार आणि मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील काही भागाचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर जारी केला.
माझे विधानसभेतील सहकारी दाजी साळकर यांच्या भाषणातून हे स्पष्ट होते की, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काही घरांमध्ये तडे जाण्याच्या आणि बेरोजगारीच्या मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी वारंवार केलेल्या विनंतीकडे दुर्लक्ष केले. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणात कबूल केले की स्थानिक आमदारांना त्यांचे सदर मुद्द्यांवर लक्ष वेधण्यासाठी निवडणूक सभा तडे गेलेल्या व बेरोजगारीचा त्रास सहन करणाऱ्यांच्या घराशेजारीच घेण्यास भाग पाडले गेले, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.
भाजप केवळ निवडणुकीच्या वेळीच लोकांपर्यंत जातो हे यावरून दिसून येते. अन्यथा त्यांना नागरिकांच्या त्रासाची आणि सुरक्षिततेच्या समस्यांबद्दल चिंता नसते. वास्कोच्या आमदाराच्या खुलाशामुळे भाजपचा अंत्योदय नारा उघडा पडला आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गेल्या 2 वर्षात ज्या घरांना तडे गेले आहेत, त्यांना भेट देण्याची तसदी घेतली नाही, ही धक्कादायक बाब आहे. गोवा शिपयार्ड लिमिटेडकडून स्थानिक तरुणांवर होणाऱ्या अन्यायाकडे त्यांनी लक्ष दिले नाही. भाजपच्या कारभाराचा खरा चेहरा समोर आला, असा टोला युरी आलेमाव यांनी हाणला.
भाजप सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले आहे. त्यांना नागरिकांच्या मनःशांतीची चिंता नाही. गोवा शिपयार्डवर उपद्रव निर्माण केल्याबद्दल कारवाई करण्यासाठी भाजप सरकार घाबरते, असे युरी आलेमाव म्हणाले.
गोमंतकीयांनी भाजपचे आमदार दाजी साळकर यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना दाखवलेल्या आरशातील भाजपचा खरा चेहरा समजून घ्यावा. भाजपने गेल्या दहा वर्षांत केलेल्या सर्व गैरकृत्यांमुळे त्यांचा पराभव करण्याची वेळ आता आली आहे, असे युरी आलेमाव म्हणाले.