‘पक्षाचे ८ कोटी घेऊन मी पळून गेलेली नाही’
बंगळुरू :
कर्नाटक काँग्रेसच्या माजी सोशल मीडिया प्रमुख व मंड्याच्या माजी खासदार आणि अभिनेत्री दिव्या स्पंदना यांनी ट्विट करून कर्नाटकच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे.
कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांच्याविरोधात विधान केल्यामुळे आपल्याला ट्रोल केले जात असल्याचा आरोप दिव्या स्पंदना यांनी केला आहे.
काँग्रेसवर निशाणा साधताना दिव्या स्पंदना यांनी ट्विट केले आहे. पक्षाचे 8 कोटी रुपये घेऊन पळून गेल्याची खोटी बातमी आपल्याविरुद्ध चालवली गेली. वैयक्तिक कारणांमुळे राजीनामा दिला असून मी कुठेही पळून गेली नाही, असे दिव्या स्पंदना यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. तसेच, या प्रकरणी काँग्रेस नेते केसी वेणुगोपाल यांना स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. याशिवाय, बदनाम करण्यासाठी ट्रोल केले जात आहे, असे दिव्या स्पंदना यांनी म्हटले आहे.
“मी काँग्रेस सोडल्यानंतर काही न्यूज चॅनेल्स चालवत होते की, मी काँग्रेस पक्षाला 8 कोटींची फसवणूक करून पळून गेले. माझी विश्वासार्हता नष्ट करण्याच्या प्रयत्नात अशा बातम्या कन्नड वृत्तवाहिन्यांवर चालवल्या जात होत्या. वैयक्तिक कारणांमुळे मी राजीनामा दिला होता. मी पक्षाची आठ कोटी रुपयांची फसवणूक केलेली नाही. मी गप्प राहिली ही माझी चूक होती.”, असे म्हणत दिव्या स्पंदना यांनी सलग दोन ट्विट केले.
दुसऱ्या ट्विटमध्ये दिव्या स्पंदना यांनी काँग्रेसचे राज्यसभा खासदार वेणुगोपाल यांना या प्रकरणी स्पष्टीकरण देण्याची विनंती केली. त्यांनी ट्विटद्वारे लिहिले की, “केसी वेणुगोपाल यांना नम्र विनंती आहे की पुढच्या वेळी तुम्ही जेव्हा कर्नाटकात असाल तेव्हा कृपया मीडियासमोर याविषयी स्पष्टीकरण द्या. वेणुगोपाल जी, तुम्ही माझ्यासाठी एवढं तरी करू शकता. मला आयुष्यभर या गैरवर्तन आणि ट्रोलिंगसह जगण्याची गरज नाही.” तसेच, दिव्या स्पंदना यांनी काँग्रेसवर आरोप केला आहे की, पक्षाने आपल्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना ट्रोल करण्यासाठी मेसेज पाठवले आहेत. पुरावा म्हणून दिव्या स्पंदना यांनी काही स्क्रीनशॉटही शेअर केले आहेत. शेअर केलेले स्क्रीनशॉट कन्नड आणि इंग्रजी भाषेत आहेत.