
डॉ. लक्ष्मी वेणू सुंदरम- क्लेटोनच्या नव्या एमडी
चेन्नई :
भारतातील आघाडीच्या वाहन घटक उत्पादक कंपन्यांपैकी एक असलेल्या सुंदरम- क्लेटोन लिमिटेड (एससीएल)च्या आज झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत डॉ. लक्ष्मी वेणू यांनी व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारला आहे. डॉ. वेणू या सुंदरम क्लेटोनच्या सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून कार्यरत होत्या.
डॉ. लक्ष्मी वेणू एका दशकाहून अधिक काळापासून सुंदरम क्लेटोनचे नेतृत्व करत आहेत. जागतिक पातळीवर सुंदरम क्लेटोनचा ठसा उमटविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. बहुतांश अमेरिकास्थित ग्राहक पुरवठा साखळीतील जोखीम कमी करण्यासाठी आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी ऑन-शोअर फाउंड्री युनिट्सच्या शोधात असतानाच तीन वर्षांपूर्वी २०१९ मध्ये अमेरिकेतील दक्षिण कॅरोलिना मधील डॉरचेस्टर येथे फाऊंड्री स्थापन करण्याचा त्यांचा निर्णय अत्यंत दूरदर्शी होता.
सुंदरम क्लेटोन लिमीटेडला जगातील एक स्पर्धात्मक, कार्यक्षम फाउंड्री बनवण्याचे काम त्यांनी केले आणि कमिन्स, ह्युंदाई, व्होल्वो, पॅकार आणि डेमलर यांच्याशी सखोल ग्राहक संबंध निर्माण केले.
सुंदरम क्लेटोनच्या व्यवस्थापकीय संचालक म्हणून पदभार स्वीकारताना डॉ. लक्ष्मी वेणू म्हणाल्या, “सुंदरम क्लेटोनला विकासाच्या पुढील टप्प्यावर नेणे हा खरोखरच मोठा सम्मान आहे. जग खूप वेगाने बदलत आहे आणि ऑटोमोटिव्ह उद्योगातील अडथळे कमी होत आहेत. भविष्यकाळाने रोमांचक, आव्हानात्मक आणि नवीन संधी सादर करण्याचे आश्वासन दिले आहे. आमच्याकडे एक उत्कृष्ट टीम आहे आणि आम्ही एकत्रितपणे सुंदरम क्लेटोनला भारतात आणि जागतिक स्तरावर मजबूत करण्यासाठी उत्सुक आहोत. मला आशा आहे की भागधारक, संचालक मंडळ, कर्मचारी आणि कंपनीच्या व्यवस्थापनाने माझ्यावर दाखविलेला विश्वास मी सार्थ करू शकेन. मानद अध्यक्ष श्री. वेणू श्रीनिवासन आणि अध्यक्ष आर. गोपालन यांच्याकडून मला मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल मी कृतज्ञ आहे. ते नेहमीच आमचे दीपस्तंभ राहतील.”