एसटी आरक्षणावरून सभागृहात घमासान
राज्य विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या सोमवारच्या पहिल्याच दिवशी अनुसूचित जमातीच्या (एसटी) राजकीय आरक्षणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झाली. काँग्रेस आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी एसटी आरक्षणावरून सभापती रमेश तवडकर यांच्यावर केलेले आरोपांवरून आमदार दाजी साळकर यांनी हक्कभंग प्रस्ताव सादर करीत आमदार डिकॉस्टा यांनी सभापतींची माफी मागावी, अशी मागणी केली. परंतु, डिकॉस्टा यांनी माफी मागण्यास ठाम नकार दिला.
आमदार एल्टन डिकॉस्टा यांनी विधानसभेत एसटी राजकीय आरक्षणावरील चर्चेचा खासगी प्रस्ताव मांडला होता. परंतु, सभापतींनी त्यांचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर सभापती आणि भाजप सरकार एसटींविरोधात असल्याची टीका आमदार डिकॉस्टा यांनी केली होती. त्यांच्या या टीकेला आक्षेप घेत आमदार दाजी साळकर यांनी सोमवारी सकाळी प्रश्नोत्तराच्या तासाला हक्कभंग प्रस्ताव आणत डिकॉस्टा यांनी सभापतींची माफी मागावी अशी मागणी केली.
यावरून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतही आक्रमक झाले. आमदार डिकॉस्टा यांनी याबाबत सभागृहात बोलणे उचित होते. सभागृहाबाहेर सभापतींबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे सभापतींसह सभागृहाचाही अपमान झालेला आहे. त्यामुळे त्यांनी सभापतींची माफी मागितली पाहिजे. सभापतींचा अपमान आम्ही सहन करून घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली.
त्यांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित करीत विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आमदार डिकॉस्टा यांनी कोणतीही चूक केलेली नाही. आम्ही सभापतींचा आदर राखतो. पण, डिकॉस्टा सभापतींची अजिबात माफी मागणार नाहीत, असे स्पष्ट केले. गरज असल्यास मुख्यमंत्र्यांनी हे प्रकरण हक्कभंग समितीकडे द्यावे, असेही आलेमाव म्हणाले.
दरम्यान, आमदार साळकर यांच्यासह संकल्प आमोणकर व भाजपच्या इतर आमदारांनीही फलक झळकावत डिकॉस्टा यांच्याकडे माफी मागण्याची मागणी केली. परंतु, डिकॉस्टा यांनी अखेरपर्यंत सभापतींची माफी मागितली नाही.