प्रसिद्ध अभिनेते रवींद्र महाजनी मृतावस्थेत सापडले
मुंबई:
प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी संग्रहित छायाचित्र
प्रसिद्ध मराठी अभिनेते रवींद्र महाजनी शुक्रवारी तळेगाव दाभाडे येथील सदनिकेत मृतावस्थेत सापडले. महाजनी हे गेल्या काही महिन्यांपासून तळेगाव दाभाडे येथील एका सदनिकेत भाडेतत्वावर राहत होते.
ते राहत असलेल्या सदनिकेतून वास येत होता. या बाबतची माहिती रहिवाशांनी पोलिसांना दिली. तळेगाव पोलिसांनी धाव घेतली. सदनिकेचा दरवाजा तोडण्यात आला. महाजनी यांचा उपचारापूर्वी मृत्यू झाला होता.
महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मिर मुंबईत राहायला आहे. गश्मिरला पोलिसांनी ही माहिती दिली असून, ते तळेगाव दाभाडे येथे रवाना झाले आहेत.शविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह ताब्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
महाजनींनी 1975 ते 1990 चा काळ गाजवला होता. मराठीतील विनोद खन्ना अशी त्यांची ओळख होती. मुंबईत टॅक्सी चालवून ते अभिनय क्षेत्रात आले. तब्बल तीन वर्ष त्यांनी टॅक्सी चालवली आहे. अगदी ते टॅक्सी चालवतात म्हणून नातेवाईकांनी त्यांच्याशी संबंध तोडले होते. व्ही शांताराम यांच्या झुंज चित्रपटातून त्यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. त्यांनतर देखण, रुबाबदार, दमदार अभिनय या जोरावर त्यांनी अनेक चित्रपट गाजवले. रवींद्र महाजनी यांचा मुंबईचा फौजदार, देवता हे चित्रपट खूप गाजले. मात्र त्यांच्या मृतदेह अशा अवस्थेत आढळल्याने मराठी चित्रपटसृष्टीला धक्का बसला आहे.
रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगावमध्ये झाला. त्यांचे वडील ह. रा महाजनी हे स्वातंत्र्यसैनिक आणि पत्रकार होते. त्यांच्या निधनानंतर रवींद्र महाजनी यांच्यावर घराची जबाबदारी आली आर्थिक जबाबदारी सांभाळण्यासाठी मिळेल ते काम त्यांनी केलं. पण जेव्हा त्यांनी टॅक्सी चालविण्याचा निर्णय घेतला त्यावेळी मात्र संपादकाचा मुलगा टॅक्सी चालवतो अशी त्यांच्यावर टीका झाली.
झुंज जरी त्यांचा पहिला चित्रपट होता पण त्यांनी सुरुवात मधुसुदन कालेलकर यांच्या जाणता अजाणता या नाटकातून सुरुवात केली. त्यानंतर तो राजहंत या नाटकातील त्यांचा अभिनय शांतारामबापूंना आवडला आणि त्यांना चित्रपटात संधी मिळाली.