‘जैवविविधता नष्ट करण्यासाठी आग माफियाचे कारस्थान’
मडगाव:
पर्यावरणविरोधी भाजप सरकारच्या आशिर्वादाने गोव्यात आग माफिया अत्यंत सक्रिय झाला असल्याचे दिसत आहे. साट्रे-सत्तरी, नावेली व केपें-कुडचडेचे डोंगर, कोरगांव येथील काजू बागायत, पाडेल-बेतोडा तसेच आग्वाद व इतर विविध ठिकाणी गेल्या काही दिवसांत लागलेल्या आगीच्या सर्व घटनांची उच्चस्तरीय चौकशी करण्याची माझी मागणी आहे, असे विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
गेल्या काही दिवसांत आगीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून गोवा अग्निशमन सेवा विभागाला अवघ्या 48 तासांत सुके गवत आणि काजू बागांना आग लागल्याचे 118 कॉल येणे हे धक्कादायक व संशयास्पद आहे, असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.
बार्देस तालुक्यातील सुकूर गावात कोमुनीदाद जमीन बिल्डर्सना विकण्याच्या हेतूने प्राचीन झाडे तसेच झुडपांचे आच्छादन असलेली व असंख्य पक्षी आणि सरपटणारे प्राण्यांचे वास्तव्य असलेली जागा जाणीवपूर्वक जाळण्यात आली अशी माहिती मला मिळाली आहे असा दावा युरी आलेमाव यांनी केला आहे.
गेल्या आठवड्याच्या शेवटी राज्यातील प्रत्येक तालुक्यात आग लागल्याचे प्रकार या आगीच्या घटनांकडे संशयाने बघण्यास वाव देतात. पर्यावरणविरोधी आणि रिअल इस्टेट माफियांचा गोव्यातील नैसर्गीक व सुपीक जमिनींचे काँक्रीटच्या जंगलात रूपांतर करण्यावर डोळा आहे असे सांगून याची सखोल चौकशी करणे आवश्यक असल्याची मागणी युरी आलेमाव यांनी केली आहे.
डोंगराळ भागात आगीच्या घटना वाढत्या तापमानामूळे होतात असा समज असला तरी गोव्यातील जंगले, निसर्ग व पर्यावरण नष्ट करण्याचे हे पद्धतशीर षडयंत्र असण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोग नेमावा व चौकशी करावी अशी माझी मागणी आहे असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.