1000 हून जास्त रुग्णांनी घेतला मोफत रुग्णवाहिका सेवेचा लाभ : अमित पाटकर
कुडचडे :
माझे वडील दिवंगत सखाराम पाटकर यांच्या स्मरणार्थ मी सुरू केलेल्या रुग्णवाहिका सेवेद्वारे कुडचडेच्या नागरिकांची सेवा करण्यात मला धन्यता वाटत आहे. मी नि:स्वार्थपणे कुडचडेवासीयांसाठी समर्पण भावनेने आणि निष्ठेने माझे कार्य करत राहीन, असे उद्गार काँग्रेसचे अध्यक्ष अमित पाटकर यांनी काढले.
पाटकर कुटुंबीयांच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या मोफत रुग्णवाहिका सेवेच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त कुडचडेचे प्रख्यात डॉक्टर डॉ. सतीश कुडचडकर यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी कुडचडेचे नगरसेवक बाळकृष्ण उर्फ पिंटी होडारकर, सामाजिक कार्यकर्ते हर्षद देसाई, आरती अमित पाटकर आदी उपस्थित होते.
गेल्या तीन वर्षांत 1000 हून अधिक रुग्णांनी रुग्णवाहिका सेवेचा लाभ घेतला. या रुग्णवाहिकेमुळे अनेक जीव वाचवण्यात आणि रुग्णांना वेळेवर वैद्यकीय मदत देण्यात यश आले याची मला धन्यता वाटते, असे अमित पाटकर म्हणाले.
कुडचडेचे सुपुत्र डॉ. सतीश कुडचडकर यांना प्रतिष्ठित बिधानचंद्र रॉय ” ख्यातनाम डॉक्टर व्यक्तिमत्व पुरस्कार” ने सन्मानित करण्यात आले हा खरोखरच आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा क्षण आहे. मी त्यांना उत्तम आरोग्य, आनंद आणि रुग्णसेवा चालू ठेवण्यासाठी शक्ती मिळू दे अशी प्रार्थना करतो
अमित पाटकर यांनी कुडचडेवासीयांना मोफत कार्डीयोवास्कूलर रुग्णवाहिका सेवा दिल्याबद्दल मला खरोखरच अभिमान वाटतो. या उपक्रमासाठी मी त्यांना आशीर्वाद देतो आणि आज माझा सत्कार केल्याबद्दल त्यांचे आभार मानतो, असे भावपूर्ण उद्गार डॉ.सतीश कुडचडकर यांनी सत्काराला उत्तर देताना काढले.
पाटकर कुटुंबियांनी पुरविलेल्या रुग्णवाहिका सेवेचा कुडचडेच्या नागरिकांना खरोखरच फायदा होत आहे. मला खात्री आहे की अमित पाटकर यापूढेही इतरांना आपला मदतीचा हात पुढे करत राहतील, असे बाळकृष्ण होडरकर यांनी यावेळी बोलताना सांगितले.
गोव्यातील ही एकमेव मोफत कार्डियोव्हास्कूलर रुग्णवाहिका सेवा आहे. कुडचडे आणि आसपासच्या भागातील लोकांना आरोग्य सेवा देण्यासाठी अथक परिश्रम करत असलेल्या कुडचडेच्या सर्व डॉक्टरांचा मी आभारी आहे असे अमित पाटकर यांनी सांगितले.
यावेळी रुग्णवाहिकेचे चालक विजय व विकी तसेच ईएमटी कर्मचारी निलेश व राजकुमार यांचाही सत्कार करण्यात आला.