‘शेतकऱ्यांच्या समस्यांवर कालबद्ध उपायांवर लक्ष केंद्रित करा’
कुंकळ्ळी :
कुंकळ्ळी येथील शेतकर्यांना मदत करण्याच्या प्रयत्नात, स्थानीक आमदार आणि विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी आज जलसंपदा विभागाचे अभियंता आणि विभागीय कृषी अधिकार्यांसह चांदर, गिरदोली, माकाझान व पारोडा येथिल कालवे आणि जलकुंभांची स्थळ पाहणी केली आणि कालव्यांच्या साफसफाई आणि देखभालीच्या सुरू असलेल्या कामांचा आढावा घेतला.
शेतकर्यांना भेडसावणार्या समस्यांवर वेळेत तोडगा काढण्यावर माझा भर आहे. कुंकळ्ळी मतदारसंघातील विविध स्थळांना भेट देऊन शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्याबद्दल मी सरकारी अधिकाऱ्यांचे कौतुक करतो, असे युरी आलेमाव म्हणाले.
माझ्या मतदारसंघात चालू असलेल्या कामांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी मी वेळोवेळी पाहणी करणार आहे. सरकारी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी व तत्परतेने कामे हाती घ्यावीत, असे युरी आलेमाव म्हणाले.
शेतकऱ्यांना मदत करणे आवश्यक आहे जेणेकरून त्यांना शेती करणे सोपे जाईल. शेतकऱ्यांना संरक्षण आणि प्रोत्साहन दिले नाही तर लोक उपाशी राहतील, असा दावा युरी आलेमाव यांनी केला.