
पणजी: गोवा सरकारतर्फे अयोध्येत ‘राम निवास’ उभारण्यात येणार आहे. यासाठी सरकारला अयोध्येत जागा मिळाली असून, राम निवासाचे काम लवकरच सुरु होणार आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. गोमंतकीय रामभक्तासांठी अयोध्येत हे हक्काचं निवास असणार आहे.
गोवा सरकारतर्फे अयोध्येत ‘राम निवास’ उभारण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री सावंत यांनी गेल्या वर्षी विधानसभा अधिवेशनात केली होती. राम निवासासाठी उत्तर प्रदेश सरकार ४ हजार चौ. मी. जमीन देणार असल्याची माहिती देण्यात आली होती. दरम्यान, घोषणेनुसार सरकारने अयोध्येत जागा घेतल्याची आनंदवार्ता मुख्यमंत्री सावंत यांनी रामभक्तांना दिली आहे. याबाबत त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत माहिती दिली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत राम मंदिर उभारण्याचे स्वप्न सत्यात उतरत आहे. याच पार्श्वभूमीवर गोवा सरकार अयोध्येत राम निवास उभारत आहे. येथे रामभक्तांना निवासासाठी हक्काची जागा मिळणार आहे, असे मुख्यमंत्री सावंत यांनी म्हटले आहे.