महिंद्रा राजपक्षे यांचा राजीनामा, देशात संचारबंदी
कोलंबो:
श्रीलंका सध्या अभूतपूर्व अशा आर्थिक संकटाला तोंड देत आहे. श्रीलंकेत सध्या सुरु असलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान महिंद्रा राजपक्षे यांनी राजीनामा दिला आहे. राजीनामा देण्यापूर्वी राजपक्षे यांनी जनतेला संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे.
राजपक्षे यांनी ट्विट करत आवाहन केले आहे की, “श्रीलंकेत भावनांचा उद्रेक वाढत असल्याने मी सर्वसामान्यांना संयम बाळगण्याचे आवाहन करतो. लक्षात ठेवा की हिंसाचाराने फक्त हिंसाचार पसरेल. आर्थिक संकट दूर करण्यासाठी ठोस समाधानाची गरज आहे. ज्याचे निराकरण करण्यासाठी हे प्रशासन वचनबद्ध आहे.”
संकटग्रस्त सरकारचे नेतृत्व करणारे राष्ट्रापती गोटाबाया राजपक्षे यांना सध्याच्या राजकीय गोंधळाचे निराकरण आणि अंतरिम प्रशासन तयार करण्यासाठी महिंदाचा राजीनामा हवा होता. खासदार मैत्रीपाला सिरिसेना यांनी गेल्या महिन्यात राष्ट्रपतींची भेट घेतल्यानंतर सांगितले होते की, “राष्ट्रपतींनी आपल्या मोठ्या भावाला पंतप्रधानपदापासून दूर करण्यास सहमती दर्शविली आहे. तसेच नवीन पंतप्रधान आणि मंत्रिमंडळाच्या नावासाठी राष्ट्रीय परिषद नियुक्त केली जाईल.”
७६ वर्षीय महिंद्रा राजपक्षे यांच्यावर त्यांच्या स्वत:च्या श्रीलंका पोदुजाना पेरामुना (SLPP) पक्षाकडून पदाचा राजीनामा देण्यासाठी दबाव होता. मात्र, त्यांनी आपल्या समर्थकांना एकत्र करत दबाव आणला होता. अखेर त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे.