google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
देश/जग

केरळमधील ‘हे’ शहर ठरले देशातील पहिले ‘साहित्यिक शहर’

युनेस्कोने जाहीर केली कला श्रेणी शहरांची यादी

केरळमधील कोझिकोड शहराला युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या साखळीमधील सूचीत (UNESCO Creative Cities Network -UCCN) स्थान देण्यात आले आहे. या साखळीत आतापर्यंत जगभरातील ५५ शहरांची नोंद करण्यात आली आहे. कोझिकोडसह मध्य प्रदेशमधील ग्वाल्हेर हेदेखील एक शहर त्यात आहे. हस्तकला आणि लोककला, डिझाईन, चित्रपट, आहारशास्त्र, साहित्य, मीडिया आर्ट्स व संगीत अशा सात सर्जनशील कला श्रेणींपैकी एका श्रेणीला वाहिलेल्या शहरांची निवड या साखळी सूचित करण्यात येते. कोझिकोडची निवड साहित्य; तर ग्वाल्हेरची निवड संगीत या कला श्रेणीत करण्यात आली आहे. ३१ ऑक्टोबर रोजी जागतिक शहर दिनानिमित्त (World Cities Day) युनेस्कोकडून ही नवी सूची जाहीर करण्यात आली.

सर्जनशीलता हा शाश्वत शहरी विकासासाठीचा धोरणात्मक घटक मानून जगभरातील शहरांमधील सहकार्याला प्रोत्साहन देण्यासाठी २००४ मध्ये UCCN ची स्थापना करण्यात आली. आज जगभरातील १०० देशांपैकी ३५० देशांचा या साखळीत समावेश करण्यात आला आहे. युनेस्कोने आखलेल्या सांस्कृतिक विविधतेच्या उद्देशाला प्रोत्साहन देण्यासाठी आणि हवामान बदल, वाढती असमानता व जलद शहरीकरण यांसारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी, तसेच त्याविरोधात अधिक लवचिकतेने कृती करण्यासाठी युनेस्कोकडून UCCN ची स्थापना करण्यात आली. या UCCN च्या स्थापनेमागे या साखळीच्या माध्यमातून विविध शहरांतील सर्जनशील, सामाजिक व सांस्कृतिक उद्योगांतील आर्थिक क्षमतांचा लाभ इतर शहरांना व्हावा, असा उद्देश आहे.

कोझिकोड व ग्वाल्हेर यांच्याव्यतिरिक्त वाराणसी (संगीत), श्रीनगर (हस्तकला आणि लोककला) व चेन्नई (संगीत) या शहरांचाही या साखळीतील सूचीमध्ये समावेश झालेला आहे.

केरळच्या उत्तरेकडे असलेल्या कोझिकोड शहरात साहित्यिक आणि सांस्कृतिक जगतातील अनेक प्रतिभावंत व नामवंत व्यक्तिमत्त्वे वास्तव्यास आहेत. या शहरात काही मोठ्या माध्यम समूहाची मुख्य कार्यालये आहेत. शेकडो प्रकाशन संस्था आणि अनेक ग्रंथालयांनी या शहराची साहित्यिक परंरपरा समृद्ध केली आहे.

१८८७ साली ‘कुंडलथा’ (Kundalatha) ही पहिली मल्याळम कांदबरी याच कोझिकोड शहरात लिहिण्यात आली. अप्पू नेदूंगडी यांनी या कादंबरीचे लेखन केले. एस. के. पोट्टेक्कट, वायोकम मुहम्मद बशीर, उरुबू, थिक्कोदियन, एन. एन. कक्कड, पी. वलसला, अकबर कक्कट्टील, पुनाथिल कुंजाब्दुल्ला व एम.टी. वासुदेवन नायर अशा सुविख्यात लेखकांमुळे कोझिकोड शहराला एक वेगळाच बहुमान मिळाला आहे. मागच्या ५० वर्षांत या शहराने अनेक चित्रपट आणि नाट्यकलाकारांनाही घडविले.

युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या साखळीद्वारे सदस्य असलेल्या इतर शहरांना शहरविकासाचा एक आवश्यक घटक म्हणून सार्वजनिक व खासगी क्षेत्रे आणि नागरी समाज यांच्या सहभागातून सर्जनशील ओळख निर्माण करण्याची संधी प्राप्त करून दिली जाते. या माध्यमातून सदस्य शहरांमध्ये भविष्यात सर्जनशीलता आणि नावीन्यपूर्ण संशोधन करणारी केंद्रे विकसित करणे आणि सांस्कृतिक क्षेत्रातील निर्माते व व्यावसायिकांसाठी विस्तृत संधी विकसित करण्याची कल्पना मांडली गेली. UCCN शहरांनी संयुक्त राष्ट्रांच्या शाश्वत विकासाचे ध्येय गाठलेले आहे.

 

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!