
पणजी: ‘विन्सन वर्ल्ड’ आयोजित दोन दिवसीय गोवा मराठी चित्रपट महोत्सवाचे उद्घाटन आज पणजी येथिल आयनॉक्स सिनेगृहात सकाळी साडे दहा वाजता मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमात ज्येष्ठ अभिनेते डॉ. मोहन आगाशे यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘कृतज्ञता सन्मान’ प्रदान करण्यात येणार आहे. डॉ. आगाशे यांनी केवळ मराठी रंगभूमी व चित्रसृष्टीतच नव्हे, तर हिंदी चित्रपटांमध्येही आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. अस्तु (२०१३) या दोन राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटाचे ते निर्माता आहेत. तसेच त्यांनी द सी वुल्व्हज (१९८०) या आंतरराष्ट्रीय चित्रपटातही भूमिका साकारली होती, ज्याचे चित्रिकरण गोव्यातच झाले होते.
हा दोन दिवसांचा सोहळा ९ व १० ऑगस्ट रोजी पणजी येथील आयनॉक्स चित्रगृह आणि मॅक्विनेझ पॅलेस येथे पार पडणार आहे. या महोत्सवात वीस हून अधिक मराठी चित्रपटांचे सादरीकरण होणार आहे. तसेच तरुण गोमंतकीय निर्माते शर्व शेट्ये यांचा ‘ कर्ज’ हा हिंदी लघुपट व किशोर अर्जून यांनी निर्माण केलेला ‘ एक कप च्या’ हा कोंकणी लघुपट प्रदर्शित केला जाईल.
दर वर्षीप्रमाणे यंदाही उद्घाटन प्रसंगी अनेक नामवंत कलाकार सहभागी होतील व प्रेक्षकांशी संवाद साधतील. कांही चित्रपटांचे दिग्दर्शक व निर्माते देखील उपस्थित राहणार आहेत.
महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, सई मांजरेकर, सुबोध भावे, रोहिणी हट्टंगडी, उपेंद्र लिमये, अजिंक्य देव, प्रसाद ओक, मृणाल कुलकर्णी, छाया कदम, किशोर कदम, जितेंद्र जोशी, गजेंद्र अहिरे, वैभव मांगले, भुषण प्रधान, गौरी इंगवले, राजेश्वरी सचदेव, शिवाली परब, नंदिनी चिकटे, अशोक समर्थ, शितल समर्थ, पार्थ भालेराव, रोहित माने तसेच इतर नामवंत कलाकार व दिग्दर्शक महोत्सवास उपस्थित राहतील असे ‘विन्सन वर्ल्ड’ चे संचालक संजय शेट्ये यांनी सांगितले. महोत्सवाचा शुभारंभ ‘निरवधी’ या महेश मांजरेकर यांच्या जागतिक प्रिमियर ने होणार आहे.