रोजगारमेळ्याची आकडेवारी प्रकाशित करण्याची मागणी
मडगाव :
भाजप सरकारने आयोजित केलेल्या रोजगार मेळ्यात १२० हून अधिक कंपन्या सहभागी होणार असून सुमारे ४ हजार नोकरीच्या संधी असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. मी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि कामगार आणि रोजगार मंत्री आंतानासियो मोन्सेरात यांना विनंती करतो की त्यांनी किती जणांनी नोकऱ्या मागितल्या, किती जणांची निवड झाली आणि किती जण प्रत्यक्षात नोकरीवर रुजू झाले याची नोंद ठेवण्याचे निर्देश आपल्या अधिकाऱ्यांना द्यावेत व आकडेवारी प्रकाशित करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी केली आहे.
मेगा जॉब फेअरबद्दल भाजप सरकारने निर्माण केलेल्या वातावरणावर प्रतिक्रिया देताना, विरोधी पक्षनेत्यांनी निदर्शनास आणले की गेल्या विधानसभा अधिवेशनात दिलेल्या उत्तरांनुसार गोव्यातील खाजगी नोकऱ्यांबाबत कामगार आणि रोजगार विभाग अनभिज्ञ होता.
माझ्याकडे विधानसभेतील प्रश्नांची उत्तरे आहेत जी गोव्यातील एम्प्लॉयमेंट एक्स्चेंजमध्ये नोंदणीकृत १.१६ लाखांपैकी केवळ ११५ बेरोजगारांना नियमित सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आणि १७४९ जणांना कंत्राटी पद्धतीने कामावर घेतले गेल्याचे तथ्य उघड करते असे युरी आलेमाव यांनी सांगितले. दुसर्या एका प्रश्नाच्या उत्तरावरून असे दिसून येते की, गेल्या पाच वर्षांत केवळ १५०६ तरुणांना खाजगी क्षेत्रात सरकारच्या मदतीने नियुक्ती देण्यात आली आहे, असे ते म्हणाले.
विरोधी पक्षनेत्यांनी कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनाही फेस्टीव्हल ऑफ आयडिया महोत्सव पुढे ढकलल्याचा कृतीवर प्रश्न विचारले आहेत. सदर महोत्सनवात व्याख्याते म्हणून कोणाला आमंत्रित केले आहे याची त्यांना कल्पना नव्हती का? रवींद्र भवनातील दुरूस्तीकामाची स्थिती काय आहे यावर ते अज्ञभीज्ञ होते का? याचे स्पष्टीकरण कला व संस्कृती मंत्र्यांनी देणे गरजेचे आहे. महोत्सव अखेरच्या क्षणी रद्द करायची पाळी आल्याने त्याची जबाबदारी निश्चित करून संबंधितांवर कारवाई करणार का? असे सवाल युरी आलेमाव यांनी विचारले आहेत.
पुढे ढकलण्यात आलेल्या ‘डी डी कोसंबी फेस्टिव्हल ऑफ आयडियाज’मध्ये सहभागी होणार्या याच उदारमतवादी व्याख्यात्याना परत निमंत्रण देणार की खोटारडेपणा आणि जुमला क्षेत्रातील तज्ज्ञांना आमंत्रित करणार, हे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी स्पष्ट करावे. भाजपच्या राजवटीत उदारमतवादी विचारसरणीला जागा नाही हे स्पष्ट आहे असे युरी आलेमाव म्हणाले.
मला कला आणि संस्कृती मंत्र्यांच्या निदर्शनास आणून द्यायचे आहे की सदर “विचार महोत्सवाची” सुरुवात काँग्रेस सरकारने केली होती. आमच्या सरकारने अभिव्यक्ती स्वातंत्र्याला प्रोत्साहन देण्यासाठी विविध क्षेत्रातील अभ्यासक आणि संसाधन व्यक्तींना आमंत्रित केले होते असे युरी आलेमाव म्हणाले.
मला आशा आहे की हा महोत्सव लवकरच आता ठरलेल्या प्रमुख वक्त्यांच्या सहभागानेच आयोजित केला जाईल. मी कला आणि संस्कृती मंत्र्यांना कुणाच्याही दबावाखाली न येण्याचे आवाहन करतो, असे युरी आलेमाव यांनी सांगितले.