गोवा पोलिसांचा होणार ‘स्वाभिमान सन्मान’
पणजी :
राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या रक्षणासाठी सदैव तत्पर आणि गोमंतकीयासाठी अहोरात्र दक्ष असलेल्या गोवा पोलिसांच्या निरपेक्ष सेवेची नोंद घेत २५ मार्च रोजी राज्यातील पोलिसांना ‘स्वाभिमान पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे. राजेश्री क्रिएशन्सच्या वतीने २५ मार्च रोजी संध्या. ६.१५ वाजता दर्या संगम, कला अकादमी येथे आयोजित या पोलिसांच्या विशेष नागरी सन्मानाला ‘राज हौऊसिंग’ यांनी पुरस्कृत केले आहे.
या सन्मान सोहळ्यात राज्यातील होमगार्डपासून सुप्रिडेंट ऑफ पोलीस पदापर्यंतच्या वेगवेगळ्या 45 पोलीस कर्मचाऱ्यांचा तसेच अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन सेवकांचा गौरव करण्यात येणार आहे.
राजेश्री क्रिएशनच्या परेश नाईक यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या सन्मान सोहळ्याला राज्याचे कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांचे सर्वोतोपरी सहकार्य लाभले आहे.
या सोहळ्यामध्ये मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत, पर्यटन मंत्री रोहन खंवटे, कला- संस्कृती मंत्री गोविंद गावडे, राज्याचे पोलिस महासंचालक जसपाल सिंग, पोलीस महानिरीक्षक ओमविर सिंग बिष्णोई यांची प्रमुख उपस्थितीत सदर सन्मान प्रदान करण्यात येणार आहेत.
पोलिसांच्या कामाप्रती राज्यांमध्ये जागरूकता निर्माण आणि सामान्य नागरिकांपर्यंत पोलिसांचे काम पोहोचावे हा या पुरस्कारामागे मुख्य हेतू असल्याचे राज्याचे कला संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले. पोलीस स्वतः तसेच त्यांचे कुटुंबीय हे अनेक अर्थाने समाजासाठी कार्यरत असतात, मात्र त्यांचे हे कष्ट, काम नेहमीच पडद्यामागे राहते. अशा पुरस्कारामुळे त्यांना समाजमान्यता मिळण्यास मदत होईल असेही गावडे यांनी यावेळी नमूद केले.
३० टक्के महिला पोलिसांचा समावेश
यावर्षीच्या स्वाभिमान सन्मान सोहळ्याचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे एकूण 45 सन्मानार्थी पैकी सुमारे 30 टक्के सन्मानार्थी या महिला आहेत. यामुळे राज्यात फक्त महिला सबलीकरण हे कागदावरच नसून प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी आणि त्याचप्रमाणे धडाडीने निर्णय घेऊन कार्यतत्परता दाखवण्यामध्येही महिलांचा सहभाग मोठ्या संख्येने असल्याचे दिसून येत असल्याचे राजेश्री क्रिएशनचे परेश नाईक यांनी सांगितले.
हास्यजत्रेतील कलाकारांची मनोरंजन मेजवानी
या सन्मान सोहळ्यात प्रसिद्ध गायिका आनंदी जोशी त्याचप्रमाणे महाराष्ट्राची हास्यजत्रा या गाजलेल्या कार्यक्रमातील विशाखा सुभेदार, आशिष पवार, पंढरीनाथ कांबळे आदी कलाकार मनोरंजनाची खुमासदार लयलूट करणार आहे. यावेळी त्यांच्यासोबत गोमंतकीय कलाकार पूजा आणि अर्पणा तसेच सिद्धांत गडेकर आणि टीम हे देखील मनोरंजन कार्यक्रमाचे सादर करणार असून, सदर संपूर्ण कार्यक्रम सर्व नागरिकांसाठी खुला असल्याचे आयोजकांच्यावतीने सांगण्यात आले आहे.