PWD मंत्री 140 कोटींच्या भरती घोटाळ्याच्या तयारीत : काँग्रेस
पणजी :
कनिष्ठ अभियंता आणि तांत्रिक सहाय्यकांच्या भरतीतील घोटाळ्यात गुंतलेली रक्कम दुप्पट करण्याच्या तयारीत गोव्यातील भाजप सरकारच्या आहे. सार्वजनीक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी “नोकरी विक्री” ची रक्कम 70 कोटींवरून 140 कोटींपर्यंत दुप्पट केल्याचा गंभीर आरोप गोवा प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष विवेक डिसिल्वा यांनी केला आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता संतोष म्हापणे यांची भेट घेऊन 2021 नंतर अभियांत्रिकी परिक्षा उत्तीर्ण झालेल्या सर्वांना तांत्रिक सहाय्यक आणि कनिष्ठ अभियंता या पदासाठीच्या लेखी परीक्षेला बसू देण्याची मागणी करणारे निवेदन सादर केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना विवेक डिसिल्वा म्हणाले की, भाजप सरकार पुन्हा एकदा भरती प्रक्रियेत घोटाळा करण्याचा प्रयत्न करत आहे.
गोवा युवक काँग्रेस आणि नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) तर्फे विवेक डिसिल्वा, साईश आरोसकर, यश कोचरेकर, लिवेन सिल्वेरा, तेजस दिवकर, अनिकेत कवळेकर, नौशाद चौधरी, प्रसन्नजीत ढगे, अल्वारो फेराव, शिफरन सय्यद आणि इतरांनी आज आल्तिनो येथे सार्वजनीक बांधकाम खात्याच्या मुख्य अभियंत्यांची भेट घेवून त्याना आपल्या मागणीचे निवेदन सादर केले.
सरकारने नवीन डिप्लोमा धारक आणि अभियांत्रिकीतील पदवीधरांना कनिष्ठ अभियंता आणि तांत्रिक सहाय्यकांच्या पदासाठी जारी केलेल्या परीक्षेच्या तारखा पुढे ढकलल्या पाहिजेत आणि नव्याने उत्तीर्ण झालेल्यांना अर्ज करण्यासाठी आणि परीक्षेला बसण्यासाठी नवीन तारखा जाहीर कराव्यात, असे विवेक डिसिल्वा यांनी सांगितले.
सरकारने भरती प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी कर्मचारी निवड आयोगामार्फत परीक्षा घेतल्या पाहिजेत आणि 2021 मध्ये जाहीर केलेल्या कनिष्ठ अभियंता आणि तांत्रिक सहाय्यकांच्या पूर्वीच्या भरती प्रक्रियेची चौकशी करण्यासाठी आणि जबाबदार व्यक्तिंवर कठोर कारवाई करण्यासाठी सेवानिवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती स्थापन करावी. यापुर्वीच्या रोजगार घोटाळ्यात सहभागी असलेल्यांवर कारवाई करा, अशी मागणी नौशाद चौधरी यांनी केली.