गोव्यात पावसाने ओलांडली सरासरी..
पणजी:
अलीकडच्या काळात ऋतूचक्र बदलत चालले आहे, त्यामुळे पाऊस आता कधीही पडू शकतो. तरीही भारतात जून ते सप्टेंबर हे चार महिने पावसाचा कालावधी मानला जातो. या काळाव्यतिरिक्त जो पाऊस पडतो तो अवकाळी समजला जातो.
तर रूढार्थाने अजून पावसाळा संपायला केवळ 9 ते 10 दिवस उरले आहेत. असे असतानाच गोव्यात पावसाने या हंगामात पावसाची सरासरी ओलांडली आहे.
राज्यात मंगळवारी सकाळी साडे आठ वाजेपर्यंतच्या 24 तासांत राज्यात सरासरी 27.2 मिलीमीडर पावसाची नोंद झाली होती. तर एकूण पावसाची नोंद 2,942.5 मिलीमीटवर पोहोचली आहे. गोव्यात सर्वसामान्यपणे पावसाची सरासरी 2,905.8 मिलीमीटर इतकी आहे.
विशेष म्हणजे, अल निनोचा प्रभाव असतानाही तसेच उर्वरित भारतीय उपखंडात मान्सूनच्या पावसाची कमतरता असतानाही गोव्यात मात्र मान्सून सामान्य राहिला आहे.
मॉन्सूनमध्ये जून आणि सप्टेंबर असे दोन सक्रीय स्पेल आहेत. वातावरणीय स्थितीचा फायदा गोव्याला झाला. समुद्रसपाटीपासून सुमारे 1,500 मीटर उंचीवर असलेल्या लो-लेव्हल जेट स्ट्रीममुळे ढग गोव्यात आले. तथापि, ऑगस्ट मात्र कोरडा गेला.”
दरम्यान, या आठवड्यात मॉन्सूनने पुन्हा जोरदार सुरवात केली आहे. मंगळवारपासून राज्यात बहुतांश ठिकाणी पावसाच्या कमी ते मध्यम अशा सरी सुरूच आहेत.