‘… त्यापूर्वी मुख्यमंत्र्यांनी सरकारच्या लोकशाही विरोधी धोरणांवर आत्मचिंतन करावे’
कुंकळ्ळी :
गोव्याची संस्कृती व वारसा जपण्यासाठी गोमंतकीयांनी सदैव लढा दिला आहे. गोव्याला आंदोलनाचा इतिहास आहे. गोमंतकीय जनतेच्या आंदोलनांनी अनेक सरकारांना आपली धोरणे व निर्णय बदलावे लागले आहेत. गोव्याची अस्मीता राखण्यात बिगर-सरकारी संस्थांचे (एनजीओ) खुप मोठे योगदान आहे. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतानी एनजीओना दोष देण्यापुर्वी सरकारच्या लोकशाही विरोधी धोरणांवर आत्मचिंतन करावे असा टोला कुंकळ्ळीचे आमदार व कॉंग्रेसचे कार्याध्यक्ष युरी आलेमाव यांनी हाणला आहे.
गोव्यातील प्रकल्पांना विरोध करीत असल्याबद्दल बिगर-सरकारी संस्थांवर काल मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलेल्या टिकेला उत्तर देताना, युरी आलेमाव यांनी कॉंग्रेस पक्ष नेहमीच लोकांसोबत राहणार असुन, आपला सुंदर गोवा क्रोनी क्लबच्या घशात घालण्याचा भाजपचा डाव कदापी सफल होऊ देणार नाही असे म्हटले आहे.
भाजपच्या मुजोरीमुळेच आज थ्री लिनीयर प्रकल्प, किनारी व्यवस्थापन आराखडा, म्हादई जल तंटा, पंचायत व नगरपालीका प्रभाग आरक्षण, नावशी मरिना प्रकल्प, खाण व्यवसाय अशा अनेक ज्वलंत प्रश्नांवर स्वाभिमानी गोमंतकीयांना विवीध न्यायालये व हरित लवादाकडे दाद मागणे भाग पडत आहे. भाजप सरकार लोकशाही मुल्ये पायदळी तुडवून केवळ आपले धोरण लोकांवर लादू पाहत आहे असा आरोप युरी आलेमाव यांनी केला.
कॉंग्रेस पक्षाच्या सराकारने नेहमीच लोकभावनांचा आदर केला व आपल्याच सरकारने तयार केलेला प्रादेशीक आराखडा व एसईझेड रद्द केले याची आठवण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी ठेवावी असा सल्ला युरी आलेमाव यांनी दिला आहे.
घटकराज्य दिनी गोव्याची अस्मिता, पर्यावरण, संस्कृती व वारसा जपण्यासाठी बहुमूल्या योगदान दिलेल्या बिगर-सरकारी संस्थाचा सन्मान करणे भाजप सरकारचे कर्तव्य होते असे युरी आलेमाव यांनी म्हटले आहे.
खासगी कंपनीना बिगर-सरकारी संस्थांकडे संवाद साधण्याचा सल्ला देण्याऐवजी, मुख्यमंत्र्यांनी लोकभावनांचा आदर करून लोकाभिमूख सरकार देण्यावर लक्ष द्यावे व सर्व संबंधितांना विश्वासात घेऊनच धोरणात्मक निर्णय घ्यावेत असे युरी आलेमाव म्हणाले.