google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

खेडेकर, कारेकर यांना ‘गोमंत विभूषण’ प्रदान

पणजी:

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज गोवा घटकराज्य दिन सोहळ्यात गोमंतविभूषण पुरस्कार प्रदान केले. कला आणि संस्कृती संचालनालयाने माहिती आणि प्रसिद्धी विभागाच्या सहकार्याने राजभवन येथील दरबार हॉल येथे पुरस्कार सोहळ्याचे आयोजन केले होते.

विनायक विष्णू खेडेकर यांना 2019-20 या वर्षासाठी लोककला क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल सन्मानित करण्यात आले. तर पंडित प्रभाकर जनार्दन कारेकर यांना 2021-22 या वर्षासाठी भारतीय शास्त्रीय संगीतातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाची सुरुवात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते विनायक विष्णू खेडेकर आणि पंडित प्रभाकर जनादर्न कारेकर यांच्या कलात्मक प्रवासाचे चित्रण करणाऱ्या आकर्षक छायाचित्र प्रदर्शनाच्या उद्घाटनाने झाली. तसेच पुरस्कार विजेत्यांच्या उल्लेखनीय कामगिरीवर प्रकाश टाकणाऱ्या पुस्तकांचे याप्रसंगी प्रकाशन करण्यात आले. दोन्ही कलाकारांची प्रतिभा आणि समर्पण दर्शविणार्‍या माहितीपूर्ण माहितीपटांचेही कार्यक्रमात प्रसारण करण्यात आले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आपल्या अभिभाषणात तरुण पिढीच्या कलागुणांना वाव देण्याचे आणि सर्व क्षेत्रांतील प्रगतीला चालना देण्याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले की, “व्यक्तींची कला आणि कर्तृत्व ओळखणे आणि त्यांचा उत्सव साजरा करणे हा गोमंत विभूषण पुरस्कार प्रदान करण्याचा आमचा उद्देश आहे. गोव्यामध्ये शैक्षणिक आणि सांस्कृतिक संधींचा खजिना आहे, ज्याचा प्रत्येक युवकाने लाभ घ्यावा. संस्कृती, परंपरा आणि व्यक्तीमत्व विकासासाठी सरकारचे पूर्ण समर्थन असल्याचे डॉ सावंत म्हणाले.

गोव्याचा समृद्ध सांस्कृतिक वारसा जतन करून तो भावी पिढीपर्यंत पोहोचवण्याच्या जबाबदारीवर कला आणि संस्कृती मंत्री गोविंद गावडे यांनी भर दिला. गोवा ही भारताची सांस्कृतिक राजधानी आहे, असे ते म्हणाले. युवकांनी आपल्या गुरूंचा सन्मान केला पाहिजे आणि वैयक्तिक प्रगती आणि यशाच्या माध्यमातून याची परतफेड केली पाहिजे.

विनायक विष्णू खेडेकर आणि पंडित प्रभाकर जनार्दन कारेकर यांनी पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!