“मी निवृत्त होण्यासाठी ही योग्य वेळ…”
अहमदाबाद:
भारताचा माजी कर्णधार, चेन्नई सुपर किंग्जचा विद्यमान कर्णधार आणि देशातल्या कोट्यवधी क्रिकेट चाहत्यांच्या गळ्यातला ताईत बनलेला माही अर्थात महेंद्रसिंह धोनी त्याच्या करिअरच्या शेवटच्या टप्प्यात असल्याचं अनेकदा बोललं जात होतं. हा धोनीचा शेवटचा आयपीएल सीजन असेल, असंही काही आजी-माजी खेळाडूंकडून सांगण्यात येत होतं. स्वत: धोनीनंही तशा प्रकारचे सूतोवाच दिले होते. चेन्नई सुपर किंग्जनं यंदाच्या आयपीएलच्या अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सला पराभूत करत आपलं पाचवं विजेतेपद पटकावलं. यानंतर प्रतिक्रिया देताना महेंद्रसिंह धोनीनं मोठी घोषणा केली आहे.
आयपीएलच्या यंदाच्या सीजनमध्ये चेन्नई सुपर किंग्जची सुरुवात खडतर झाली होती. सुरुवातीच्या काही सामन्यांमध्ये चेन्नईच्या बॉलर्स आणि फिल्डर्सकडून झालेल्या चुकांमुळे नाराज झालेल्या धोनीनं कर्णधारपदावरून पायउतार व्हायचाही इशारा दिला होता. त्यानंतर मात्र चेन्नईच्या संघानं आपली कामगिरी उंचावत नेली. रविवारी संध्याकाळी नियोजित असणारा अंतिम सामना पावसामुळे सोमवारी संध्याकाळी खेळवला गेला आणि पावसामुळेच तो मंगळवारी पहाटे २ वाजेपर्यंत चालला. शेवटच्या चेंडूपर्यंत ताणल्या गेलेल्या सामन्यात चेन्नईनं गुजरातचा पराभव करत पाचवं जेतेपद पटकावलं.
सामन्यानंतरच्या बक्षीस वितरणावेळी हर्षा भोगलेनं महेंद्रसिंह धोनीला पहिलाच प्रश्न त्याच्या पुढील वाटचालीबाबत विचारला. “मी तुला प्रश्न विचारू की तू स्वत:च ते सांगणार आहेस?” असं हर्षा भोगलेंनी विचारताच धोनीला प्रश्नाचा अंदाज आला. “नाही, तुम्ही मला प्रश्न विचारा, मग मी त्यावर उत्तर दिलं तर योग्य राहील!” असं उत्तर धोनीनं दिलं.
“मी गेल्या वेळी सीएसकेनं आयपीएल स्पर्धा जिंकली तेव्हा तुला विचारलं होतं की तू सीएसकेसाठी कोणता वारसा मागे सोडून जात आहेस? तेव्हा तू म्हणाला होतास मी अजून कोणताही वारसा मागे सोडलेला नाही”, एवढं बोलून हर्षा भोगले थांबला आणि धोनीनं उत्तर द्यायला सुरुवात केली.
“तर तुम्हाला आता उत्तर हवंय? जर तुम्ही परिस्थितीचा विचार केला तर मी आयपीएलमधून निवृत्ती जाहीर करण्यासाठी ही योग्य वेळ आहे. मी या सीजनमध्ये जिथे कुठे सामने खेळायला गेलो, तेव्हा चाहत्यांचं माझ्यावरचं प्रेम पाहाता माझ्यासाठी त्यांना धन्यवाद म्हणणं ही फार सोपी बाब आहे. पण पुढचे ९ महिने मेहनत घेऊन पुढच्या आयपीएल सीजनमध्ये खेळण्यासाठी पुन्हा येणं ही माझ्यासाठी कठीण बाब आहे. पण मला ही गोष्ट माझ्या चाहत्यांसाठी करायची आहे”, असं धोनीनं म्हणताच मैदानावर उपस्थित हजारो प्रेक्षकांनी धोनी-धोनी नावाचा गजर सुरू केला.
“माझ्या शारिरीक स्वास्थ्यावर, फिटनेसवरही हे अवलंबून असेल. हे ठरवण्यासाठी माझ्याकडे ६ ते ७ महिने आहेत. मला वाटतं हे माझ्याकडून माझ्या चाहत्यांसाठी एक प्रकारचं गिफ्ट असेल. हे माझ्यासाठी फार कठीण असणार आहे. पण चाहत्यांनी मला दिलेलं प्रेम पाहाता हे माझं त्यांच्यासाठी गिफ्ट असेल. ही अशी गोष्ट आहे, जी मला माझ्या चाहत्यांसाठी करायची आहे”, असं धोनी म्हणाला.