google.com, pub-9712496482420627, DIRECT, f08c47fec0942fa0
गोवा

‘सरकारने मडगावमधील वाहतूक कोंडी सोडवण्यावर भर द्यावा’

मडगाव :
जड वाहनांसह सततच्या रहदारीमुळे शाळकरी मुले शाळेत जाताना आणि घरी परतताना रस्ता ओलांडताना जीव मुठीत धरून असलेली पाहणे खरोखरच भयावह आहे. मडगाव येथील वाहतूक कोंडीचा प्रश्न सोडविण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी युवा नेते प्रभव नायक यांनी केली आहे.

मडगाव येथे एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना, प्रभव नायक यांनी बांबोळी येथील कुजिरा संकुलाच्या धर्तीवर शाळा संकुल तयार करण्यासाठी आधीच जागा निश्चित केलेल्या दवर्ली येथे मडगाव शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या शाळा स्थलांतरीत करण्यासाठी सक्रिय पावले उचलण्याची मागणी केली.

आज दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना एक निवेदन सादर करुन, मडगावच्या सर्व प्रमुख रस्त्यांवरील पार्किंग झोनचे सीमांकन करण्याची मोहीम हाती घेण्याचे मी मागणी केली आहे. पार्किंगसाठी जे विभाग आहेत तेथे पांढऱ्या रेषांनी रंगरंगोटी करणे आवश्यक आहे, तसेच चारचाकी, दुचाकी, तीन चाकी वाहने इत्यादींचे सीमांकन दर्शविणारे योग्य फलक उभारणे आवश्यक आहे, असे प्रभव नाईक यांनी नमूद केले.

वाहतुकीचे नियमन आणि पार्किंगचे नियमन करण्यासाठी सरकारने शहरातील सर्व मुख्य रस्त्यांवर जास्तीत जास्त वाहतूक कर्मचारी तैनात केले पाहिजेत. उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करावी. मडगावातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस आणि आरटीओ यांनी समन्वयाने प्रयत्न करावेत, असे मत प्रभव नायक यांनी व्यक्त केले.

जुन्या बसस्थानकाच्या परिसराचे योग्य सीमांकन करून पार्किंगसाठी वापर करणे आवश्यक आहे. सदर बसस्थानक आता अपघातग्रस्त वाहनांचे डम्पिंग यार्ड बनले आहे. अनेक वाहने तेथे महिनोमहिने पडून असल्याने, वाहनांच्या नियमित पार्किंगसाठी जागा उपलब्ध होत नाही, असे प्रभव नायक यांनी सांगितले.

शहरातील सिटी बसेस तसेच मडगावातून जाणाऱ्या बसेसवर काटेकोर नजर ठेवण्याची वेळ आली आहे. सदर बसचालकांकडून प्रवाशांना घेणे आणि सोडणे यात अजिबात शिस्त राखली जात नाही. बसेस कुठेही थांबत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होते. जिल्हाधिकाऱ्यांनी शहराचे सर्वेक्षण करून मडगाव शहरातील बस थांब्यांना सूचित केले पाहिजे, असे प्रभव नायक म्हणाले.

मला आशा आहे की दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी तसेच सरकार माझ्याद्वारे उपस्थित केलेल्या समस्यांची दखल घेतील आणि मडगावच्या नागरिकांना तसेच मडगावला दररोज येणाऱ्या हजारो गोमंतकीयांना दिलासा देण्यासाठी त्वरित कार्यवाही सुरू करतील, असे प्रभव नायक म्हणाले.

दरम्यान, समाजसेवक प्रभव नायक यांनी सकाळी दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना मडगावचे नागरीक मुकेश पटेल, विपूल सोळंकी, तनुजा वेर्णेकर, अशोक जांबोडकर यांच्यासोबत भेटून वाहतूक समस्येवर निवेदन सादर केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!