हृदय जिंकायचे असेल तर हॉस्पिसिओ येथे कॅथ लॅब सुरू करा : प्रभव नायक
मडगाव : जागतिक हृदय दिनाच्या निमित्ताने, मडगांवचो आवाज व युवा नेते प्रभव नायक यांनी गोवा सरकारला, गोमंतकीयांच्या आरोग्य आणि कल्याणासाठी आपली बांधिलकी दाखवून तातडीने हॉस्पिसियो दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात कॅथ लॅब सुरू करावी अशी मागणी केली आहे.
प्रभव नायक यांनी निदर्शनास आणून दिले की, दक्षिण गोव्यात अशा अत्यावश्यक सुविधेचा अभाव अनेक जीव गमविण्यास कारणीभूत ठरला आहे. हृदयविकाराचा झटका व हृदयाशी संबंधित आणीबाणीच्या रुग्णांना बांबोळी येथिल गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पिकळ किंवा खासगी रुग्णालयांकडे जावे लागते. “एकंदर प्रवासात लागणारा वेळ अनेकदा जीवघेणा ठरतो आणि नागरिकांना वेळेत उपचार मिळत नाहीत,” असे त्यांनी सांगितले.
वैद्यकीय सेवेतील या तातडीच्या समस्येकडे लक्ष वेधून, प्रभव नायक म्हणाले की, वेळेवर हृदयविकार उपचार मिळणे हा प्रत्येक नागरिकाचा मुलभूत हक्क आहे. हॉस्पिसियो येथे पूर्ण क्षमतेने कार्यरत कॅथ लॅब सुरू झाल्यास असंख्य जीव वाचतील तसेच कुटुंबांवरील मानसिक आणि आर्थिक ओझेही कमी होईल व दर्जेदार आरोग्यसेवा सर्वांना उपलब्ध होईल, असा दावा प्रभव नायक यांनी केला आहे.
“गोमंतकीयांचे ह्रदय जिंकणे हे भाषणांमधून किंवा आश्वासनांतून होत नाही, तर थेट जीवनाला स्पर्श करणाऱ्या ठोस कृतींमधून होते. कॅथ लॅब सुविधा उभारणे म्हणजे आरोग्यसेवेबाबत सरकारची खरी प्रामाणिकता सिद्ध करण्याची खरी कसोटी ठरेल,” असे प्रभव नायक यांनी स्पष्ट केले.
जागतीक ह्रदय दिनाी मडगांवचो आवाज व प्रभव नायक यांनी पुन्हा एकदा सरकारला तातडीने पावले उचलून तसेच राजकारण बाजूला ठेवून जनतेसाठी हॉस्पिसियोत कॅथ लॅब स्थापन करा, असे आवाहन केले आहे. दक्षिण गोव्याच्या जनतेचा तो हक्क असून, योग्य कृती करणे सरकारचे कर्तव्य आहे, असे प्रभव नायक शेवटी म्हणाले.


